मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

 रत्नागिरीचे सुपुत्र पद्मविभूषण व मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री कै. बाळासाहेब खेर यांचे रत्नागिरी शहरात स्मारक व्हावे- बाळ माने यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 रत्नागिरी – उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन विनंती केली आहे. त्यांनी दिलेल्या पत्रामध्ये रत्नागिरीचे सुपुत्र आणि मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री, पहिल्या पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी कै. बाळासाहेब खेर यांनी केलेले विविध क्षेत्रातील कार्य पुढच्या अनेक पिढ्यांसाठी आदर्शवत ठरणारे आहे. त्यांचे कार्य व्यक्तीच्या जीवनाला दिशा देणारे व समृद्ध करणारे असे आहे. ते रत्नागिरीचे रत्न होते. परंतु आजपर्यंत रत्नागिरीमध्ये त्यांचे स्मारक उभे राहिलेले नसल्याचे सांगितलं आहे.

त्यानी पत्रात पुढे असे म्हटलं आहे की ब्रिटिशकालीन बॉम्बे प्रांताचे (ज्यामध्ये महाराष्ट्र व गुजरात यांचा समावेश होता) ते सन १९३७ ते सन १९३९ असे दोन वर्ष पहिले मुख्यमंत्री व स्वातंत्र्यानंतर ही पाच वर्षे पहिले मुख्यमंत्री होते याच काळात ते शिक्षण मंत्री सुद्धा होते. कै. बाळासाहेबांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. महात्मा गांधीजींचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यामुळे मिठाच्या सत्याग्रहाच्या सविनय कायदेभंगाच्या मोहिमेत सहभागामुळे त्यांना १३ महिन्यांचा कारावास झाला. १९४२ च्या चले जाव आंदोलनात सहभाग असल्याने त्यांना दोन वर्षे सक्षम कारवास भोगावा लागला.

कै. बाळासाहेब खैरे यांनी शालेय शिक्षणात शारीरिक शिक्षण विषयी सक्तीचा केला. भारतातील एकमेव महिला विद्यापीठाला कायदेशीर शासकीय मान्यता त्यांनी दिली. तसेच महाराजा सयाजीराव विद्यापीठ, महोद कर्नाटक विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद व पुणे विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता.

सन १९४८ मध्ये कोकणचे गांधी कै. आप्पासाहेब पटवर्धन यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी रत्नागिरीतील आपल्या मालमत्तेचा आपल्या आईच्या नावे ट्रस्ट करून त्या मार्फत सर्वोदय छात्रालयाची स्थापना रत्नागिरीत केली. आज सर्वोदय छात्रालय चांगल्या रीतीने काम करत असून त्याला ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत या ट्रस्टचे जिल्हाधिकारी पदसिद्ध विश्वस्त आहेत.

कै. बाळासाहेब खैरे यांनी आपल्या आयुष्यात महाराष्ट्र विधिमंडळ सदस्य, भारतीय संविधान समितीचे सदस्य, राजभाषा समितीचे सदस्य, युनायटेड किंगडममधील भारताचे उच्चायुक्तपदी काम केले. तसेच ते गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष होते. सामाजिक शैक्षणिक कार्यात एक पैशाचाही अपहाराचा ठपका नसलेले आणि स्वतःची जन्मगावची सर्व मालमत्ता आईच्या नावाने काढलेल्या श्रीमती. यमुनाबाई खेर ट्रस्टला दान करणारे कै. बाळासाहेब खेर हे आदर्शवत आहेत. त्यांच्या या कार्याची स्मृती राहण्यासाठी रत्नागिरीत सध्या बांधकाम सुरू असलेल्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीला त्यांचे नाव द्यावे व त्यांचा पूर्णाकृती पुतळा त्याच आवारात उभारून कायमस्वरूपी स्मारक उभे करावे.

तरी सदर विनंतीचा विचार करून कै. बाळासाहेब गंगाधर खेर यांचे स्मारक उभारून रत्नागिरी शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक नगरीला न्याय मिळावा ही विनंती केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button