कृषी दिनाच्या निमित्ताने..

कृषी दिनाच्या निमित्ताने..
▪️भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा व ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा आहे. भारतातील बहुतांश लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. भारतातील लोक शेतात विविध प्रकारचे प्रयोग करतात. शेती हा मानवाची प्राचीन संस्कृती आहे. अन्न ,वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत . शेती हा संपूर्ण राष्ट्राचा पाया आहे. म्हणूनच शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणून ओळखले जाते.
▪️भारताला शेतीची प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे भारतातील 80% लोक शेती करतात पूर्वी भारतातील शेतकरी एवढा आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळाला नव्हता .पण आता मात्र बदलत्या काळानुसार शेतकरी शेती करू लागला आहे .आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवू लागला. सध्याचा शेतकरी हा स्मार्ट फॉर्मिंग करू लागला आहे. बदलत्या काळानुसार वेगवेगळ्या प्रकारची पिके निवडू लागला आहे. त्यासाठी त्या पिकाची योग्य अशी माहिती agree app द्वारे तो घेत आहे.
https://www.facebook.com/newssangameshwar?mibextid=ZbWKwL
▪️कोकणातील शेतीचा विचार करता अजूनही काही शेतीमध्ये बदल होणे आणि ते शेतकऱ्यांनी स्वीकारणे महत्त्वाचे आहे. कोकणातील शेतकरी आणि घाटावरील शेतकरी यांच्यामध्ये शेती करण्यामध्ये खूप फरक दिसून येतो. कारण कोकणामध्ये जून ते ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पाऊस असतो तर घाटमाथ्यावरती कमी प्रमाणात पाऊस पडतो. तरीसुद्धा शेतीचे उत्पादन घेण्यामध्ये घाट माथ्यावरील शेतकरी पुढे असतो. याचे कारण हेच आहे की कोकणामध्ये विशेषता रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्याचा विचार करता ठराविकच पिके शेतकरी घेत असतो. ती पिके घेण्यासाठी त्याला बारा महिने कष्ट करावे लागतात. कोकणातील विशेषता भात, नाचणी ,वरी ही पिके पावसामध्ये घेतली जातात. त्यामध्ये भात व नाचणी पिकांचा उत्पादन क्षमता जास्त असल्याचे दिसून आलेले आहे. मात्र, हे उत्पादन घेताना शेतकरी ज्या पद्धतीने शेतीमध्ये बदल करून आधुनिक शेतीचा वापर करावा पाहिजे तसे अजून होताना चित्र दिसत नाही.
▪️शेतीचे काही प्रकार असून त्यानुसार शेतकरी शेती करत असतो. यामध्ये धान्य शेती, फळबाग शेती, पशुधन शेती, मत्स्य शेती, ऊस शेती, सेंद्रिय शेती आणि शेती आधारित उद्योग अशाप्रकारे शेतीचे प्रकार असून शेतकरी त्याच्या क्षमतेप्रमाणे शेती करत असतो. विशेषत:
▪️कोकणात धान्य शेतीस प्राध्यान्य दिले जाते. घाटमाथ्यावरती मोठ्या प्रमाणात शेती बरोबरच पशुधन शेती सुद्धा केली जाते. सध्या आता काही शेतकरी आर्थिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवत मत्स्य शेतीकडे सुद्धा वळताना दिसतात. घाट माथ्यावरती मोठ्या प्रमाणात आपल्याला ऊस शेती सुद्धा पहावयास मिळते. त्या ठिकाणी साखर कारखाने मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ऊस शेती उत्पादन करून शेतकऱ्यांना साखर कारखान्यांना ऊस देण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे . मात्र कोकणात पाहिले तर धान्य शेती हा एक पर्याय शेतकरी वापरात. या धान्य शेतीमधील भात शेती आणि नाचणी पीक याचे उत्पादन केले जाते. हे उत्पादन करताना सुद्धा हल्ली शेती करण्याचे प्रमाण फारच कमी झालेले आहे. गावातील लोकसंख्या घटल्यामुळे किंबहुना रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्यामुळे गावातील काही कुटुंब मुंबईसारख्या शहरांमध्ये स्थलांतर झाली आहेत. त्यामुळे गावच्या ठिकाणी पूर्वी शेती करण्यासाठी लोक धडपडत होती. मात्र आज भात शेती आणि वरकस जमिनीमधील नाचणी पिकाची शेती सर्व ओसाड झाली आहे. विशेषता भात पिकासाठी पाणतळ आवश्यक असते. अशा ठिकाणी सुद्धा मनुष्यबळ आणि पशुधन कमी झाल्यामुळे शेतीचे प्रमाण फारच कमी झालेले आहे.
▪️पूर्वी शेतकरी शेतात पारंपारिक सेंद्रिय खताचा वापरत होता. मात्र मधल्या काळात युरिया आणि सुफला सारख्या रासायनिक खतांचा वापर करण्यामागे शेतकऱ्यांचा कल गेला आणि या खतांचा वापर करून भरघोस पीक उत्पादन शेतकरी घेऊ लागला. मात्र याचे दुष्परिणाम सुद्धा शेतकऱ्यांना काही वर्षानंतर कळू लागले. शेतीचा किंवा जमिनीचा पोत बिघडणे, जमीन नापीक होणे, पिकवलेले धान्य हे रासायनिक युक्त असल्यामुळे त्याचा शरीरावरती विपरीत परिणाम होऊ लागला. आजार वाढू लागले . मात्र आता पुन्हा एकदा कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना सेंद्रिय खत वापरून शेतीसाठी करण्यासाठी आवाहन केले जात आहे. सेंद्रिय शेती करताना गिरीपुष्प, पालाश, नत्र , गांडुळ खत, शेणखत यांचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना तयार केले जात आहे. मात्र आधीच रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत बिघडल्यामुळे सेंद्रिय खत किती प्रमाणात लागू पडेल हे सांगता येणार नाही.
जनावरांच्या मलमुत्रापासून बनणारे खत शेतीस उपयुक्त
▪️जगात किती ही प्रगत तंत्रज्ञान झाले तरीही जुन्या लोकांनी तयार केलेल्या काही पद्धती आजही किफायतीदार ठरत आहेत. त्यामुळे जुने ते सोने’ असे म्हटले तर काही खोटे ठरणार नाही. शिक्षण नसतानाही त्यांनी शेती विषयक अवलंबलेले तत्कालिन धोरण सर्वांगिन विकासाठी पूरक होते.
▪️पूर्वीचा शेतकरी आपल्या शेतीची मशागत करताना शेणखताचा वापर करीत असे. आता मात्र खतांचा सुळसुळाट झाल्याने आणि भरपूर पिक उत्पादन करण्यासाठी शेतकरी रासायनिक खताकडे वळले. परंतु, कृषी संशोधकांनी ही रासायनिक खते शेतीसाठी हानिकारक ठरल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सेंद्रिय खताकडे शेतकरी वळत असून जनावरांच्या मलमुत्रांपासून बनणारी खते शेतीसाठी उपयुक्त ठरत आहेत.
▪️जनावरांच्या मलमुत्रापासून शेतकऱ्यांना काही उपयुक्त खते बनविता येतात. याबाबत कृषी तज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शेणखत, मुत्रखत, लेंडीखत, कोंबडीखत, गांडुळ खत अशा खतांचा समावेश आहे. जनावरांच्या मलमुत्राचा उत्तम प्रकारे वापर करून खतनिर्मिती केल्यास जमिनीची अन्नद्रव्याची व पाण्याची गरज काही प्रमाणात भागवता येते. जनावरांचे मूत्र योग्य पध्दतीने जमा करून ते इतर टाकाऊ सेंद्रिय पदार्थात शोषणासाठी टाकले पाहिजे अथवा मातीत शोष खड्डात त्याचा वापर केला पाहिजे.
▪️खरतर गायींचे मूत्र हे किटकनाश म्हणून सुद्धा वापरले जाते. जनावरांचे मूस, धान्याचा भूसा, ज्वारी, मका, गहू व भाताच्या पेंढ्यांचे बारीक बारीक तुकडे, सुके शेण याद्वारे मूत्रखत तयार करता येते. मूत्रखतामुळे पिकाची प्रत ही सुधारण्यास मदत होते. जनावरांच्या मुत्रातील नत्र, युरिया स्वरूपात असून त्यातील नत्र, स्फुरद, पालाश व इतर घटक उपयुक्त ठरतात. त्यामुळे सेंद्रिय खताचा वापर करणे गरजेचे आहे.
शेती करताना शेतीमधील आव्हाने
▪️नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर ,रोगराई, बाजारातील चढ उतार, पिकांच्या किमती कमी जास्त होणे, खते व कीटकनाशक यांचा अतिवापर अशा अनेक प्रकारची आव्हाने शेतकऱ्यांसमोर समस्या म्हणून येत असतात. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागते. कधी पूर परिस्थिती निर्माण झाली तर शेतीचे नुकसान होते. पिकांवर पडणारे रोग यामुळे उत्पादन क्षमतेत घट होते. खत व कीटकनाशक यांचा अती वापर केला तरी सुद्धा त्याचा परिणाम पिकांवरती होताना दिसतो. मात्र पिक विमा योजना या योजनेमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरून काढता येते. त्यासाठी पिकाचा विमा काढणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सिंचनाच्या सोयीमध्ये सुधारणा करून शेतकरी त्या योजनेचे लाभ घेऊ शकतात.
▪️शासनाकडून आता अनेक योजना शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत त्याचं लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे सुद्धा वळले पाहिजे त्यामुळे उत्पादन क्षमता वाढून शेतकऱ्यांचे परिश्रम सुद्धा कमी होताना दिसतात.
संतोष कुळे


