प्रताप सावंत देसाई यांना भावपूर्ण श्रध्दांजली

फेसबुकवर प्रताप सावंत देसाई यांचे अपघाती निधनाचे वृत्त वाचले आणि प्रचंड हादरलो. या वृत्तावर विश्वासच बसत नव्हता. अखेर यासीन पटेलला फोन केला. त्याने सांगितलेले वृत्त तर पार धडकी भरविणारे होते. प्रयागहून येताना नाशिक-सिन्नर मार्गावर कार अपघातात आमच्या मित्राचे दुर्दैवी निधन झाले. एक सुन्न करणारा प्रसंग.
प्रताप सावंत देसाई माझे अत्यंत घनिष्ठ आणि जिवलग मित्र, त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील सहभाग, योगदान आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा मिठ्ठास स्वभाव यामुळे या मैत्रीला अधिक प्रगल्भता आली. काल सकाळी १०. ३५ वाजता त्यांचा मला फोन आला. प्रयागला गेलो आहोत. महाकुंभमेळासाठी आलो आहोत… तेथे गंगा-यमुना आणि अदृष्य सरस्वती नदीच्या ऐतिहासिक संगमावर डुबकी घेण्याचे स्नान करण्याचे परमभाग्य लाभले… ह्यावर्षीचा महाकुंभमेळा… असा योग पुन्हा १४४ वर्षाने येईल. आम्हाला खूप उत्तमरित्या गंगास्नान करता आले.. इत्यादी ते अगदी आनंदाने भरभरून सांगत होते. आम्ही कसे आलो आणि आता रत्नागिरीच्या परतीच्या वाटेला लागत आहोत इत्यादी तपशीलही त्यांनी अत्यंत उत्साहाने सांगितला. जवळपास अर्ध्या तासापेक्षा अधिकच प्रतापराव बोलत होते. आणि कुंभमेळाच्या भव्यतेची दृष्य माझ्या मनःचक्षू समोर तरळत होती. अचानक त्यांना दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आठवण झाली. आपण या साहित्य संमेलनाला जाऊ या असे ते म्हणाले. मी त्यांना २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ संमेलन असल्याचे कळविले… संमेलनाचा पूर्ण कार्यक्रमही कळविला. तसेच आता मराठी भाषा मंत्री आपले पालकमंत्रीच आहेत, तेव्हा महाराष्ट्र सदनात सामंत साहेबांना निवासाची व्यवस्था करण्यास सांगू असेही कळविले. त्यावर त्यांचा मेसेज आला… “एकत्रित प्लॅन करू या… ठरवूया… आणखी कोण जाऊया?” आणि आज सकाळी हे वृत्त आले… अंगावर पहाड कोसळावे असे!
प्रताप सावंत देसाई यांची स. रा. देसाई डीएड कॉलेजचे प्राचार्य म्हणून शैक्षणिक क्षेत्रातील कारकीर्द अत्यंत वैशिष्ठ्यपूर्ण होती. एक आदर्श आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक होता. प्राचार्य पदावरून निवृत्त झाल्यावर त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला अधिकच बहर आला. शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी त्यांची सदैव धडपड असे. रत्नागिरी शहरातील शैक्षणिक क्षेत्रातील एक अभयासू आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. विविध शिक्षण संस्था आणि शैक्षणिक उपक्रमांसोबत ते जोडलेले होते. शिक्षण, अभ्यासक्रम, त्यातील बारकावे आणि त्यातील नवे संशोधन यात त्यांचा विशेष अभ्यास होता. या संबधित विषयावर त्यांची विविध ठिकाणी मार्गदर्शनपर व्याख्याने झाली आहेत.
सामाजिक क्षेत्रातील त्यांचा वावर हा विलक्षण उत्साहवर्धक आणि उर्जाशील असे. मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे ते अत्यंत महत्त्वाचे पदाधिकारी होते. तसेच श्रीराम मंदिर तेथील विविध उपक्रम, ज्येष्ठ नागरिक संघ, तेथील विविध उपक्रम त्याचे नियोजन यात त्यांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग असे. माणसांशी संवाद करणे आणि त्यांना आपल्या मिठास आणि लाघवी स्वभावाने आपलेसे करत जोडून घेणे ही प्रताप सावंत देसाई यांची खासीयत होती. त्यामुळे जशा मधाच्या पोळ्याला मधमाशा जोडल्या जातात अगदी तसाच मित्रपरिवाराचा थवा त्यांच्यासोबत जोडलेला असे.
प्रताप सावंत देसाई हे रत्नागिरीचे एक भूषण होते. त्यांच्या आकस्मिक अपघाती निधनाने या शहराचे, जिल्ह्याचे आणि विशेषतः शैक्षणिक चळवळीचे अपरिमीत नुकसान झाले आहे. त्यांच्या क्रियाशील चळवळीचा कार्यमग्नतेचा वारसा पुढे चालविणे आणि सदैव सकारात्मक विचारांची कास धरणे हीच त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली🙏
कोंकण दिनांक परिवार, नवनिर्माण परिवार आणि मातृमंदिर परिवारातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐🙏🙏
– अभिजीत हेगशेट्ये


