मुख्य बातमी

जुन्नरमध्ये आगळावेगळा ‘जुन्नर गोल्ड’ आंबा.

एकस्व' अधिकारासाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे!

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील बुचकेवाडी येथील प्रगतशील शेतकरी भरत रेवजी जाधव यांच्या आंबाच्या बागेत दोन आगळीवेगळी आंब्याची झाडे आढळून आली आहेत. नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रामार्फत या झाडांवर संशोधन करून जाधव यांनी हे वाण विकसित केले आहे. हापूस, केसर आणि राजापुरी वाणमिश्रित स्वाद असलेल्या या आंब्याच्या वाणाचे ‘जुन्नर गोल्ड’ असे नामकरण करून एकस्व अधिकारासाठी (पेटंट) दिल्ली येथील ‘प्रोटेक्शन ऑफ प्लॅन्ट व्हायटी अँड फार्मर्स राइट्स ॲथॉरिटी’कडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

‘जुन्नर गोल्ड’ हा वाण राजापुरी वाणासारखा दिसणारा आहे. त्याचे वजन ८०० ते १००० ग्रॅम आहे. कोईचे वजन केवळ ४० ते ५० ग्रॅम आहे. या आंब्याचा स्वाद हापूस, केसर आणि राजापुरी वाणमिश्रित आहे. शेतकरी पीक जाती संरक्षण कायद्यांतर्गत या वाणाला एकस्व अधिकार (पेटंट) मिळण्यासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रामार्फत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

जाधव यांनी २२ वर्षांपासून दोन हेक्टर जिरायती जमिनीत आंबा झाडांची लागवड केली आहे. त्यात आंब्याच्या विविध जातींची जोपासना केली आहे. यात हापूस, केसर, राजापुरी, बदामी, लंगडा आदी वाणांची चारशेहून अधिक झाडे; तसेच सीताफळ आणि डाळिंब फळबाग केली आहे. हे उत्पादन सेंद्रिय पद्धतीने करण्यात येते. त्यांच्या आंबा बागेत वेगळी वैशिष्ट्ये असलेली दोन झाडे आढळून आली.

उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी २०२४ मध्ये जाधव यांच्या आंबा बागेस भेट दिली. त्यावेळी शिरसाठ यांना या बागेत नवीन पद्धतीचा विकसित झालेला आंब्याचा वाण पाहावयास मिळाला. या वाणाची पाहणी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिल तात्या मेहेर आणि अन्य काही अधिकाऱ्यांनी केली. कृषी विज्ञान केंद्रातील उद्यानविद्या विषयतज्ज्ञ भरत टेमकर आणि पीक संरक्षण विषयतज्ज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे यांनी बागेतील दोन्ही झाडांची प्रत्यक्ष पाहणी करून जाधव यांच्या नावाने केंद्र सरकारच्या नवी दिल्ली येथील ‘प्रोटेक्शन ऑफ प्लॅन्ट व्हायटी अँड फार्मर्स राइट्स ॲथॉरिटी’कडे प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली. या झाडाची फळे आणि पाने यांचे नमुने घेऊन प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच, नाशिक येथील प्रयोगशाळेतही संबंधित नमुने परीक्षणासाठी पाठविण्यात आले आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल प्राप्त देखील झाला आहे.

याबाबत अनिल तात्या मेहेर आणि भरत जाधव म्हणाले, ‘या वाणाला दरवर्षी फळधारणा होते. वजन सरासरी ८०० ते ९०० ग्रॅम असते, तर काही फळांचे वजन १ किलोपर्यंत भरले आहे. फळाचा रंग बाहेरून पिवळा व आतून केसरी आहे. चव हापूस, केसर व राजापुरीमिश्रित असून अन्य वैशिष्ट्येही अहवालात नमूद केली आहेत.’

नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रामार्फत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. दिल्ली येथून लखनऊ विद्यापीठ येथे हा प्रस्ताव गेला आहे. लखनऊमधील पथक झाडे पाहण्यासाठी येणार आहे. – भरत जाधव, प्रगतशील शेतकरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button