मुख्य बातमी

अवघ्या १० तासांत लावला गुन्ह्याचा छडा : रत्नागिरी पोलिसांची कामगिरी

नांदगाव - चिपळूण येथील वृद्धाचा खूनी गजाआड

रत्नागिरी : नांदगाव खुर्द (सावर्डे, ता. चिपळूण) येथील वृद्ध महिलेचा खून केलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. घटनास्थळाची बारकाईने निरीक्षण करत असताना घरातील एका कोपऱ्यात ब्ल्यू टूथ आढळून आला. त्यानंतर श्वान पथकाच्या सहकार्याने तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि अवघ्या ८ ते १० तासांत या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला जेरबंद करण्यात आले. स्वप्नील परशुराम खातू (४६, रा. नांदगांव खुर्द, गोसावीवाडी, ता. चिपळूण, सध्या घाटकोपर पूर्व, मुंबई) असे त्याचे नाव असून त्याला न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी बजावलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सर्व टीमसाठी रोख ५० हजार रुपयांचे बक्षीस विभागून देणार असल्याचे जाहीर केले.

आज (२९ ऑगस्ट) सायंकाळी जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवृत्त पोलीस कर्मचारी परशूराम पवार यांच्या पत्नी सौ. सुनिता (वय ६९) यांचा निर्घृण खून करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र व हातातील सोन्याच्या बांगड्या असा ऐवज चोरून नेण्यात आला होता. ही घटना २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली होती.

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी वेगवेगळी पथके नेमली होती. त्यानुसार या गुन्ह्याचा तपास चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या अधिक मार्गदर्शनानुसार एका पथकाने गुन्हा घडल्या ठिकाणी भेट देऊन तसेच स्थानिकांकडे चौकशी करून घटनास्थळावरील भौतिक व तांत्रिक पुराव्याच्या आधारे स्वप्नील खातू याला ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.

सौ. सुनिता पर्शुराम पवार यांनी आरोपीला “तू बेवडा आहेस” असे बोलल्यामुळे त्याचा राग मनात धरून स्वप्नीलने वृद्धेच्या डोक्यात घरातील गॅस सिलेंडर घालून त्यांचा खून केला आणि त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची कबुली दिली आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, गुहागर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सावंत, सावर्डे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख, अलोरे शिरगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांच्यासह मोबाईल फॉरेन्सिक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मागाडे, सावर्डे पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गमरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मनिष कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल आंबेरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमती घोसाळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल कदम, महिला पोलीस नाईक श्रीमती मेश्राम, पोलीस कॉन्स्टेबल जड्यार, महिला पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती जाधव, पोलीस कॉन्स्टेबल कदम, पोलीस कॉन्स्टेबल चोचे, सहाय्यक पोलीस फौजदार मोहिते, महिला हेड कॉन्स्टेबल गामरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल कान्हेरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेतील पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल नार्वेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल आरवट, पोलीस नाईक आदावडे, पोलीस नाईक देसाई, पोलीस कॉन्स्टेबल वागदकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल कदम, अलोरे शिरगांव पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल नाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गव्हाणे, गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल वनगे, पोलीस कॉन्स्टेबल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल माने, श्वान पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सावंत, पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल घुगरे, मोबाईल फॉरेन्सिक पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल हातकर, पोलीस कॉन्स्टेबल दाभाडे यांचा या पथकामध्ये समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button