खोटा जन्म दाखला दिल्या प्रकरणाची सखोल चौकशीची रत्नागिरी भाजपची मागणी

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी शहराजवळील शिरगाव ग्रामपंचायतीकडून बांगलादेशी नागरिकाला खोटा जन्म दाखला देण्यात आला होता. अशा गंभीर गुन्ह्याच्या सखोल चौकशीसह मागील १० वर्षांत सर्व ग्रामपंचायतींनी दिलेल्या जन्म दाखल्यांची चौकशी करावी आणि दोषी आढळल्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी रत्नागिरी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली.
रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या आदेशानुसार भाजपच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.
१२ जानेवारी शिर्डी येथे भारतीय जनता पक्षाचे अधिवेशन आहे. त्याठिकाणी मुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील यासंदर्भातील पत्र देण्यात येणार आहे. दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी भाजपच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे, जिल्हा उपाध्यक्ष नंदू चव्हाण, सुप्रिया रसाळ, युवामोर्चा प्रदेश सचिव विक्रांत जैन, जिल्हा उपाध्यक्ष बाबू सुर्वे, मंडल खजिनदार शैलेश बेर्डे उपस्थित होते.



