मारुती मंदिर ते आठवडा बाजार काँक्रिटीकरणामुळे रस्त्याच्या दुतर्फा ‘नो पार्किंग झोन’

रत्नागिरी : शहरामध्ये १० जानेवारीपासून मारुती मंदिर ते आठवडा बाजार चौक या दरम्यान रस्त्याचे काँक्रिटी करण्याचे काम सुरू आहे. हे काँक्रिटीकरण पूर्ण होईपर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी मारुती मंदिर ते आठवडा बाजार चौक या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा नो पार्किंग झोन जाहीर केला आहे.
काँक्रीटीकरणामुळे रस्त्याच्या एका मार्गिकेवरून दोन्हीकडील वाहतूक चालू करण्यात आलेली आहे. एका मार्गिकेवरून वाहतूक सुरळीतपणे चालू रहाण्यासाठी रस्त्याच्या दुर्तफा लावण्यात येणाऱ्या वाहनांना निर्बंध घालणे आवश्यक आहे. रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी दोन्ही बाजूंना नो पार्किंग झोन होणे आवश्यक आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५ अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी, चंद्रकांत सूर्यवंशी यांनी १० जानेवारीपासून मारुती मंदिर ते आठवडा बाजार चौक या दरम्यान रस्त्याचे काँक्रिटी करण्याचे काम सुरू असल्याने, एका मार्गिकेवरून वाहतूक सुरळीतपणे चालू रहाण्यासाठी रस्त्याच्या दुर्तफा लावण्यात येणाऱ्या वाहनांना निर्बंध घालण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने न लागण्यासाठी नो पार्किंग झोन म्हणून जाहीर केला आहे.
वाहतुकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे व वाहतुक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम ११६ प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारणेची कार्यवाही पोलीस विभागाकडून करण्यात यावी, असेही आदेशात नमूद आहे.



