ओणी येथे दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना न्यायालयाने ठोठावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरील राजापूर – ओणी येथे दोन तरुण व एका अल्पवयीन मुलाने रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना अडवून त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात दोघांना न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अजय माणिक घेगडे (रा. राजापूर माठ, मूळ रा. ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), दीपक बाळासाहेब श्रीमंदिलकर (रा. रामलिंग, ता. शिरूर, जि. पुणे) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, १८ मे २०२४ रोजी दुपारी ३.१५ वा ते ३.३० वाजण्याच्या सुमारास मौजे ओणी, राजापूर येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या उतारावर दोन तरुण व एका अल्पवयीन मुलाने त्यांच्या ताब्यात असणाऱ्या चोरीच्या होंडा युनिकॉर्न या मोटारसायकल वरून येऊन एका ॲक्टिवा गाडी चालकाला मधेच अडवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन व हातातील सोन्याची अंगठी बळजबरीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच पाठीमागून येणाऱ्या फिर्यादी यांची मोटारसायकल अडवून त्यांच्यावर हुबेहूब पिस्टलसारखा दिसणारा लायटर रोखून व धाक दाखवून फिर्यादीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेण्यात आला आणि पैशाची मागणी करून लुटण्याचा प्रयत्न केला गेला. या घटनेनंतर हे तिघेही पाचल मार्गे अणूस्कुरा घाटाकडे पळ काढण्यामध्ये व अणुस्कुरा घाटातील जंगलमय भागामध्ये लपून बसण्यात यशस्वी झाले होते.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लागलीच घटनास्थळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी भेट देऊन राजापूर पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार, आरसीपी व क्युआरटी रत्नागिरी चे अंमलदार, श्वान पथक तसेच नजीकच्या येरडव व पांगरी गावातील ग्रामस्थांची वेगवेगळी पथके तयार करून अणूस्कुरा घाटातील जंगलमय भागामध्ये आरोपींचा कसून शोध घेण्याचे निर्देश दिले.
निर्देश मिळताच अणुस्कुरा चेकपोस्ट व रायपाटण दूरक्षेत्र येथे नाकाबंदी करण्यात आली व येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाहनांची पोलीसांमार्फत कसून तपासणी करण्यात येत होती. तसेच जंगलमय भागात आरसीपी, क्युआरटी प्लाटून, श्वान पथकामार्फत शोध घेण्यात येत होता. या शोध मोहिमेमध्ये येरडव व पांगरी गावांतील ग्रामस्थांची एक आरोपी ताब्यात घेण्यात पोलिसांना मदत झाली. पुढे ही शोध मोहीम अजून एक दिवस चालली व त्याच दिवशी इतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले. मुदतीत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार राजापूर पोलीस ठाणे भादविसंचे कलम ३९३ व ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
दोन दिवसांच्या शोध मोहिमेमध्ये मिळून आलेल्या या गुन्हयातील आरोपीतांकडे पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे व पथकामार्फत कसून तपास करण्यात आला. यात १) संगमेश्वर पोलीस ठाणे, फरासखाना पोलीस ठाणे (पुणे) आणि कोरेगाव पार्क पोलीस ठाणे (पुणे) येथे दाखल असलेले इतर ३ गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यात वापरलेली लायटर-पिस्टल, मोटरसायकल असा एकूण २ लाख किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध राजापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दोषारोपपत्र पाठविण्यात आले होते. तसेच गुन्ह्यातील साक्षीदार, पंच व तपासी अधिकारी यांच्या मा. न्यायालयात साक्षी होऊन गुन्ह्यातील आरोपी अजय माणिक घेगडे आणि दीपक बाळासाहेब श्रीमंदिलकर यांच्याविरुद्ध सबळ पुरावा निर्माण झाल्याने न्यायालयाने या आरोपींना १६ ऑक्टोबर रोजी २ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, लांजा यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख, सहाय्यक पोलीस फौजदार श्री. वाघाटे, पोलीस हवालदार श्री. तळेकर, अणुस्कुरा चेकपोस्ट व रायपाटण दूरक्षेत्रचे अंमलदार, राजापूर पोलीस ठाण्याचे अंमलदार, आरसीपी व क्युआरटी प्लाटून, रत्नागिरी तसेच मौजे येरडव व पांगरी गावांतील ग्रामस्थ यांनी पार पाडली.



