गुहागरमधील चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू
चार दिवसांसाठी एसटीच्या ६५६ गाड्यांचे बुकिंग : २६ हजारांहून अधिक प्रवासी करणार बसने प्रवास

गुहागर : काल (१२ सप्टेंबर) गौरीबरोबर पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले. विसर्जनानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले असून, त्यांच्या सेवेसाठी गुहागर आगर सज्ज झाले आहे. चार दिवसांसाठी ६५६ गाड्यांचे बुकिंग झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
गणपती सणासाठी चाकरमानी हे कोकण रेल्वे, खासगी बस, खासगी चारचाकी वाहनांनी गावी आले होते; मात्र बहुतांश चाकरमान्यांनी एसटी बसला पसंती दिली होती. परतीच्या प्रवासातही चाकरमान्यांनी एसटीचेच आरक्षण केले असून, हजारो चाकरमान्यांचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी गुहागर आगार सज्ज झाले आहे. प्रवाशांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची सेवा कशी देता येईल, याचे नियोजन केले आहे.
१२ सप्टेंबर रोजी ३० एसटी बसचे बुकिंग होते. १३ सप्टेंबर रोजी १५३, १४ सप्टेंबरला ३५३, तर १५ सप्टेंबरला १२० गाड्यांसाठी बुकिंग करण्यात आले आहे. १२ ते १५ सप्टेंबर या चार दिवसांच्या कालावधीत ६५६ एसटी गाड्यांचे बुकिंग झाले असून, २६ हजार २४० एवढे प्रवासी एसटी बसने प्रवास करणार असल्याची माहिती आगर व्यवस्थापक सौ. सोनाली कांबळे यांनी दिली.



