मिऱ्या-नागपूर महामार्गावर भीषण अपघातात रत्नागिरीतील दोघांचा दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर महामार्गावर शहराजवळ टीआरपी येथे आज (२५ ऑक्टोबर) सकाळी भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात येथील दोघांचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डंपरची (एमएच ०८ एच २२९२) धडक बसून दुचाकीवरून (एमएच ०८ पी ००७४) जाणाऱ्या या दोघांचा मृत्यू झाला आहे. राघवेंद्र धुरी (रा. साईनगर, रत्नागिरी) आणि मुक्तेश्वर ठीक (रा. प्रशांत नगर) अशी त्यांची नावे आहेत.
हा अपघात इतका भीषण होता की या दोघांचे चेहरे ओळखता येत नव्हते. त्यावेळेस सुरुवातीला या अपघातात मृत्यू झालेल्या या दोघांची ओळख पटवणे कठीण झालं होते. त्यांना परिसरात ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी व नागरिकांनी तात्काळ रत्नागिरी रुग्णालयात हलवले आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर आता पोलीस व नागरिकांच्या मदतीने त्यांची ओळख पटली आहे.
मिऱ्या-नागपूर महामार्गावर गेले कित्येक महिने रस्ता रुंदीकरणाचे वगैरे काम सुरू आहे. या परिसरात डंपरसारख्या मोठ्या वाहनांची वर्दळ कायम असते. या परिसरात यापूर्वीही काही अपघात घडले आहेत. डंपरची ठोकर बसल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे अवजड वाहनांच्या वेग मर्यादेवर सध्या कोणाचे नियंत्रण नसून या परिसरातून जाणाऱ्या अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण घालण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होऊ लागली आहे.
राघवेंद्र धुरी आणि मुक्तेश्वर ठीक हे दुचाकी घेऊन जात असताना डंपरची भीषण धडक झाल्याने यामध्ये दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी संबंधित डंपर चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, अशी मागणी आता परिसरातून होऊ लागली आहे. रत्नागिरी पोलिसांनी या सगळ्याची गंभीर दाखल घेतली असून सिव्हिल रुग्णालयात व घटनास्थळी रत्नागिरी पोलीस हजर झाले आहेत. टीआरपी परिसरात घटनास्थळी पंचनामा करण्याची कार्यवाही पोलिसांकडून सुरू आहे.



