दादासाहेब सरफरे विद्यालय व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

संगमेश्वर तालुक्यातील बुरंबीसारख्या दुर्गम भागात शिक्षणाचे कार्य करण्याच्या उद्देशाने सन १९६५ साली स्थापन करण्यात आलेल्या बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेची घोडदौड आज दैदीप्यमान दिशेने सुरू आहे. या संस्थेने लावलेला शाळेचा वेलू आज गगनाला झेपावताना दिसत आहे. संस्थेच्या दादासाहेब सरफरे माध्यमिक विद्यालय व कला- वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय बुरंबी-शिवने नेहमीच विविधांगी उपक्रमात आपली छाप उमटवत यशाची शिखरे पादाक्रांत करत आहे. यापूर्वी साने गुरुजी गुणवत्ता विकास आदर्श शाळा हा पुरस्कार प्राप्त झाला होता, तर आता राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. विद्यालयाचा व कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस चढताच आहे. या घवघवीत यश आणि संस्था ६० व्या वर्षात पदार्पण करीत आहे यानिमित्ताने, संस्थेच्या एकूणच यशस्वी कारकिर्दीचा घेतलेला थोडक्यात मागोवा.
सन १९६४ साली प्राथमिक शाळांना जोडून इंग्रजीचा आठवीचा वर्ग देण्याची योजना रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासनाने जाहीर केली होती. आणि यावेळीच माध्यमिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्यास हालचाली सुरू झाल्या. यावेळी कै. विश्राम रावजी तथा बाबासाहेब सरफरे मुंबईहून गावी स्थायिक झाल्यानंतर या पंचक्रोशीत त्यांच्या पुढाकाराने सहकार व संघटना याचा प्रचार करून तेर्ये बुरंबी येथे ‘बुरंबी पंचक्रोशी जनसेवा संघ’ ही संस्था स्थापन झाली. येथे आरोग्य केंद्र मिळावे असे प्रयत्न सुरू झाले. दरम्यानच्या कालावधीत या ठिकाणी आत्माराम तथा बबनशेठ भिंगार्डे यांच्याकडून १५ गुंठे जागा मिळाल्यानंतर पंचक्रोशीतील जनतेच्या सहकार्याने या ठिकाणी समाज मंदिर उभारण्यात आले. बाबासाहेब सरफरे यांच्या निधनानंतर संस्थात्मक चळवळीची गती कमी झाली. यावेळी समाज मंदिराच्या वास्तूची देखभाल तत्कालीन सरपंच बाबासाहेब गर्दे हेच पाहत होते. शासनाचा इंग्रजी शिक्षणाबाबतचा उपक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टीने समाज मंदिराचा उपयोग करता येईल असा विचार कोसुंब गावातील श्री. शामराव भिकाजी जाधव व श्री. काशीराम गंगाराम जाधव या कार्यकर्त्यांच्या मनात आला आणि त्यांनी बाबासाहेब गर्दे यांच्याशी विचारविनिमय केला. या विचाराला पुढे चालना देण्यासाठी पंचक्रोशीतील तत्कालीन १५ जणांची एक समिती नियुक्त करण्यात आली. पंचक्रोशीतील मुलांच्या इंग्रजी शिक्षणाची सोय करण्याकरिता हायस्कूल उभे राहणे गरजेचे होते आणि त्यासाठी संस्था देखील आवश्यक होती. म्हणूनच संस्थेची निर्मिती आणि शासकीय मान्यता या महत्त्वाच्या बाबींसाठी मुंबईतील ज्येष्ठ कार्यकर्ते कै. पंढरीनाथ तथा दादासाहेब विश्राम सरफरे यांना भेटण्यासाठी बाबासाहेब गर्दे, शामराव भिकाजी जाधव व काशीराम आत्माजी जाधव या तिघांचे शिष्टमंडळ मुंबईत पाठवण्यात आले. यावेळी तपशीलवार चर्चा केल्यानंतर दादासाहेब सरफरे यांनी पंचक्रोशीतील मुंबईस्थित कार्यकर्त्यांची सभा घेऊन ॲड. श्रीधर जिवाजीराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ‘बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबई’ ही संस्था १९६५ साली स्थापन करून रजिस्ट्रेशन प्राप्त केले आणि समाजमंदिरातून शाळेला सुरुवात झाली.
बुरंबी येथील समाज मंदिरात उपलब्ध झालेल्या हॉलच्या मध्यभागी पडदा लावून दोन वर्ग सुरू करण्यात आले. १९६७ साली भूकंपाचा मोठा धक्का बसला. यात शासनाने भूकंपग्रस्तांना काही मदत देऊ केली. या मदतीचा उपयोग पत्राच्या शेड उभ्या करून अजून दोन वर्गखोल्या करण्यात आल्या आणि दहावी, अकरावीचे वर्ग तयार झाले. अशा परिस्थितीमध्ये तत्कालीन संस्थाचालकांनी, ग्रामस्थांच्या आर्थिक मदतीच्या आणि वस्तूरूप देणगी व श्रमदानातून सुमारे १४ वर्ग खोल्यांची निर्मिती केली. वाढती विद्यार्थी संख्या पाहता या वर्ग खोल्या देखील कमी पडत होत्या. कालांतराने क्रीडांगणावर देखील वर्ग खोल्या बांधण्यात आल्या.
कालांतराने वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे, लहान वर्गखोल्यांमुळे दाटीवाटीने बसायला लागत होते. जागेचा अभाव, क्रीडांगणाचा अभाव यातच येथील परिसरात विस्ताराला मर्यादा होत्या. यावेळी शिवणे येथे १९८१ साली मुरलीधर उर्फ दादा ढोल्ये यांच्या पुढाकाराने यनुनाबाई डिंगणकर आदींची जागा मिळविली. या जागेत अपेक्षित इमारत बांधता येत नव्हती. परिणामी विस्ताराला गती मिळत नव्हती. यादरम्यान नव्वदच्या दशकात पावसामुळे वर्गखोल्यातून झऱ्याचे पाणी येत असल्यामुळे बसण्याची समस्या तीव्रतेने भेडसावत होती. याही परिस्थितीत संस्थेची विद्यार्थीनी प्रज्ञा देशमुख ही मार्च १९९९ साली दहावीला बोर्डात आली आणि संस्थेला अजूनच ऊर्जा मिळाली. संस्थेची क्षमता असतानाही काळानुरूप विविध शैक्षणिक उपक्रम राबविणे जागेअभावी अशक्य होत होते आणि शाळाबाह्य प्रगतीला ही मर्यादा येत होत्या. हे लक्षात आल्यानंतर २००२ साली संस्थेने ध्येय निश्चित ठेवून सुमारे ३० हजार चौरस फूट बांधकामाच्या तब्बल दीड कोटी रुपयांचे बजेट असलेल्या इमारतीचा संकल्प संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष कै. सुभाष सरफरे, उपाध्यक्ष अशोकभाई सरफरे, उपाध्यक्ष कै. श्रीराम तथा भाई हेगशेट्ये, सरचिटणीस कै. अजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली घोषित केला. आणि २ एप्रिल २००३ ला या प्रकल्पाला सुरुवात झाली.
शिवणे येथे ४ एकर जागा शाळेसाठी प्राप्त झाली असतानाच या जागेलाच जोडून संस्थाचालकांच्या प्रयत्नाने रामचंद्र अनाजीराव कदम यांच्या वडिलांच्या म्हणजेच अनाजीराव कदम यांच्या स्मरणार्थ एक एकर जागा देणगीरूपाने २००३ साली शैक्षणिक उपक्रम राबविण्यास संस्थेस दिली आणि नव्या इमारतीच्या प्रकल्पास सुरुवात झाली. संस्था, संस्थेचे हितचिंतक, मित्रपरिवार, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, शाळेतील शिक्षकवृंद व कर्मचारी तसेच अपना परिवार व इतर देणगीदार त्यांच्या आर्थिक मदतीतूनन १ मे २००५ साली प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे म्हणजेच १५ हजार चौरस फुटाचे बांधकाम पूर्ण झाले.
२००५ नंतर खऱ्या अर्थाने संस्थेच्या या इवल्याशा रोपट्याने झेप घेण्यास सुरुवात केली. शैक्षणिक प्रगती तर होतीच, मात्र शाळाबाह्य विविध उपक्रमांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुयश मिळविण्यात सातत्य राखले. २००७ पासून संस्थेने तालुकास्तरिय कला-क्रीडा महोत्सवासारखा मोठा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. तालुक्यातील खेळाडूंना व विविध कलेत पारंगत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे सुप्त गुण विकसित करण्यासाठी गेली अनेक वर्ष हा महोत्सव आजही अविरत संस्थेकडून सुरू आहे. यातून अनेक कला-क्रीडा-सांस्कृतिक यांसारख्या विविध क्षेत्रात अनेक स्तरावर विद्यार्थी नैपुण्य प्राप्त करत आहेत.
दरम्यानच्या कालावधीत १५ हजार चौरस फुटाचा उर्वरित बांधकामाचा टप्पा संस्थेने टप्प्याटप्प्याने पूर्ण केला. यात विशेषत्वाने नमूद करावी लागणारी बाब म्हणजे याच प्रकल्पामध्ये ५०० आसन क्षमतेच्या एका मल्टीपर्पज हॉलची निर्मिती संस्थेने केली आहे. एखाद्या कॉर्पोरेट दर्जाच्या हॉलप्रमाणे हा हॉल असल्याचे उद्गार अनेकांकडून व्यक्त होत आहेत. या अद्ययावत व भव्य संकुलामुळे सुसज्ज अद्ययावत वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा, भव्य संगणक कक्ष, ई-लर्निंगच्या सुविधा, आकर्षक कलादालन, विविध खेळांसाठी प्रशस्त मैदान आदी सुविधा संस्थेने दादासाहेब सरफरे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध केल्या आहेत. जिमखाना, व्यायामशाळेसह सर्व परिसर सीसीटीव्ही निगराणीखाली आहे. माध्यमिक विद्यालयाच्या सोबत संस्थेने एक पाऊल पुढे टाकून ११ वर्षांपूर्वी कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची निर्मिती केली. यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना जवळच्या जवळ बारावीपर्यंत शिक्षण उपलब्ध झाले आहे.
सर्वच स्तरावर विद्यार्थ्यांकडून शिक्षकवृदांकडून सातत्यपूर्ण मेहनत करून घेत असल्याने यशामध्ये देखील सातत्य राखले जात आहे. यामुळेच साने गुरुजी गुणवत्ता विकास आदर्श शाळा जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देखील शाळेला प्राप्त झाला. यानंतर आता या वर्षात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानामध्ये शाळा प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. ही बाब संस्था, शाळा, कनिष्ठ महाविद्यालया बरोबरच बुरंबी दशक्रोशीतील अनेकांना तसेच माजी विद्यार्थ्यांना अभिमानास्पद व कौतुकास्पद ठरली आहे. या वाटचालीत संस्थेचे हितचिंतक, पदाधिकारी, संचालक यांचा मोलाचा सहभाग आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेतील सातत्यपूूर्ण यश
एनएमएमएससारख्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी विद्यार्थी व स्थानिक शिक्षकांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिरे विद्यालयात घेण्यात आली. अनेक तज्ञ प्रशिक्षकांनी यामधे मार्गदर्शन केले. या शिबिरांमुळे विद्यार्थी व शिक्षकांना मोठाच फायदा झाला. शाळेचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत चमकू लागले. यासाठी शाळेतील शिक्षकवृंदांकडून विनामोबदला ज्यादाचे तास घेतले जातात. याचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होत आहे. फलस्वरूप इतर राज्यस्तरीय स्पर्धेमधेही शाळेचे विद्यार्थी सहभाग नोंदवून यश प्राप्त करत आहेत.
अद्ययावत शिक्षण पद्धतीचा अवलंब
संगणकीय युगात काळानुरूप विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे मिळण्याबरोबरच ई-लर्निंग शिक्षण पद्धतीवर भर देण्यात येतो. ई-लर्निंगकरिता एक स्वतंत्र वर्ग आहे. याबरोबरच स्वतंत्र संगणक लॅब देखील आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व्हिडीओ दाखवण्यासाठी प्रोजेक्टर देखील संस्थेने शाळेला उपलब्ध करून दिले आहेत. याचा वापर देखील चांगल्या प्रकारे होत आहे.
कला-क्रीडा- सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश
गेली १७ वर्षे संस्था व शाळेच्या वतीने तालुकास्तरीय कला – क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यांतून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्यांच्या कला क्रीडा, सांस्कृतिक गुणांना चालना मिळते. येथील प्रशस्त परिसर व मोठे मैदान यातून मैदानावरील वावर वाढला आणि पुढे योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थी घडत गेले. येथे खेळलेल्या अनेक गुणी खेळाडूंनी कबड्डी, खो-खो आणि मैदानी खेळात राज्यस्तर, राष्ट्रीय स्तरावर आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली आहे. यावर्षीच्या प्रो कबड्डीत आंतरराष्ट्रीय स्तरावर बंगाल वाॅरिअर्स संघात कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थ्यी सिध्देश तटकरे याची निवड झाली होती.
याबरोबरच सांस्कृतिक आणि चित्रकलामध्ये देखील आपल्या कलेच्या जोरावर विद्यार्थ्यांनी राज्यस्तरापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. यावर्षी प्रथमच शाळेतील विद्यार्थ्यांच्या चित्रकला, हस्तकला व रांगोळी कलाकृतींचे प्रदर्शन २६ ते ३० जानेवारीदरम्यान शाळेत आयोजित करण्यात आले होते. त्याला तालुक्यातील नामवंत कलाशिक्षक व दर्दी रसिकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक केले. त्याचबरोबर
नाट्याभिनय व कथाकथन स्पर्धांमध्येही शाळेचे विद्यार्थी सातत्यपूर्ण घवघवीत यश संपादन करून शाळेचे नाव रोशन करत आहेत.
गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी मदत
संस्था नेहमीच एका परिवाराप्रमाणे राहत असून आपल्या शाळेत विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या अडीअडचणी सोडवताना दरवर्षी गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना अनेक दानशूर व्यक्तींकडून मदत मिळवून देत असते. एसटी पासेस असो अथवा शैक्षणिक साहित्य वा गणवेश असो ते गरजूंना दरवर्षी संस्थेकडून दिले जाते. सुमारे दोन ते सव्वादोन लाखांचा खर्च या उपक्रमासाठी केला जातो. हा वारसा संस्था पुढेही चालू ठेवणार आहे.
पंचक्रोशी बाहेरील ही विद्यार्थ्यांचा शाळेकडे वाढता ओघ
विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमाबरोबरच शाळाबाह्य इतर उपक्रम नियमित राबवून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कला-क्रीडा गुणांना संधी व प्रोत्साहन देण्याचे काम शिक्षक व संस्था सातत्याने करत आहे. तसेच शाळेतील शिस्त, शिक्षकांकडून घेतली जाणारी मेहनत आणि प्रगतीचा चढता आलेख कायम राखल्यामुळेच अनेक पालक आपल्या पाल्यासाठी या शाळेला प्रथम पसंती देतात. म्हणूनच आजही पटसंख्या साडेआठशेच्या घरात आहे.
कायमस्वरूपी सुसज्ज मैदानाची उपलब्धता आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाची सुविधा
क्रीडा क्षेत्रामध्ये तालुक्यामधील विविध शाळांतील विशेष क्रीडा नैपुण्य असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्यासाठीची सोय करण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यादृष्टीने संस्थेचे प्रयत्न चालू आहेत. यासाठीच आवश्यक त्या सोयी सुविधा मिळवण्यासाठी संस्था शासकीय निधी तसेच दानशूर व्यक्तिंच्या शोधात आहे. जेणेकरून क्रीडांगणाचा विकास झाल्यावर क्रीडाक्षेत्रातील तज्ञांकडून येथे कायमस्वरूपी प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करू इच्छिते.
नाट्याभिनय-संगीत शास्त्राचा अभ्यासक्रम विचाराधीन
विद्यार्थ्यांच्या अभिनय-गायन-संगीत या गुणांचा विकास व्हावा म्हणून अभिनय व संगिताचे धडे सुरु करण्याचा मानस संस्थेचा आहे. शाळेतील, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी अष्टपैलू व्हावा याच भावनेतून हा एक अनोखा उपक्रम राबविण्याचा मानस संस्थेचा आहे.
ऋणनिर्देश : संस्थेच्या आजपर्यंतच्या दैदीप्यमान वाटचालीत देणगीदार व हितचिंतकाचा मोठा वाटा आहे. संस्था त्यांची अत्यंत ऋणी आहे. यापुढेही त्यांचे असेच पाठबळ मिळत राहो ही सदिच्छा!
(सचिन सीताराम मोहिते, देवरुख)


