धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्थेजवळ तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन्यास निर्बंध

रत्नागिरी : जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (२५ नोव्हेंबरपर्यंत) निर्बंध घालण्यात येत असल्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम १५ ऑक्टोबर रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन त्यांनी निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात येत असल्याबाबतचे आदेश दिले आहेत. प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनी क्षेपकावर पोलीस विभागाने जाहीर करुन त्यास प्रसिध्दी करावी असेही आदेशात म्हटले आहे.



