
रत्नागिरी : रत्नागिरीत बांगलादेशी नागरिकांचे सुरू असलेले वास्तव्य, साखरी नाटे (ता. राजापूर) येथे नव्याने होणारी १५३ कोटींची जेटी, रत्नागिरी शहरातील आरक्षित भुखंडांचा मुद्दा आणि डेव्हलपर कडून थिबापॅलेस परिसरातील ग्रीन झोनमधील होणारी झाडांची कत्तल या सगळ्या विषयांवर मनसेने दंड थोपटले आहेत. तर जयगड येथील जिंदल कंपनीच्या वायुगळती प्रकरणाचा अहवालही जिल्हा प्रशासनाकडून २० दिवस होवूनही जाहीर केलेला नाही. हे मुद्दे दाबण्याचा प्रशासनस्तरावर प्रयत्न झाल्यास मनसे गंभीर दखल घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
या विषयांसदंर्भात येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाध्यक्ष सौंदळकर यांनी आज (१ जानेवारी) पत्रकार परिषद घेतली. या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष न घेतल्यास मनसे याविषयांवर आक्रमक पाउल उचलणार असल्याचे परखड मत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. त्यावेळी उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, कामगार सेनेचे जिल्हा चिटणीस महेंद्र उर्फ भाऊ गुळेकर, माजी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष श्री. खामकर आदी उपस्थित होते.
रत्नागिरीत जिकडेतिकडे वावर असलेल्या बांगलादेशी लोकांचा मुद्दा मांडला. या नागरिकांची पोलीस यंत्रणेने कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे. परप्रांतीय कामगार ठेवणाऱ्या येथील बागायतदार, मच्छी व्यवसायिक यांनी आपल्याकडील कामगारांच्या नोंदणी पोलीस यंत्रणेकडे करावी असे आवाहन केले.
साखरी नाटे येथे नव्याने जेटीचे काम सुरू आहे. पण या जेटीच्या बांधकामाची इत्यंभूत माहिती तेथील ग्रामस्थ, यांनाही दिलेली सांगण्यात आले. बंदर अधिकारी यांनी देखील याप्रश्नी माहिती जाणून घेण्यासाठी गेलेल्या मनसे अधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. बंदर अधिकाऱ्यांकडून या जेटीबाबत शंका निरसन केले जात नसल्याने उपोषणाचा इशारा सौंदळकर यांनी दिला आहे. यासंदर्भात राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांयाकडे तक्रार करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
रत्नागिरी नगर पालिका हद्दीत थिबा पॅलेस आकाशवाणी केंद्राजवळ या आरक्षित ग्रीन झोनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. मात्र या प्रकाराकडे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून डोळेझाक करण्यात आलेली आहे. याविरोधात संबधित पुणे येथील कार्यालयाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे सौंदळकर यांनी सांगितले. तर नगर पालिकेने या आरक्षित जागा विकासकांना बिनधास्त दिल्या जात आहेत. मोठ्या आरक्षित जागा विकासकांना देऊन छोट्या खोकेधारकांवर मात्र कारवाईचा बडगा उगारला जात असल्याबाबत आक्षेप घेण्यात आला असल्याचे सचिन शिंदे यांनी सांगितले.
जयगड येथे वायुगळती होऊन २० दिवसांपूर्वी जिंदल कंपनीच्या शेजारी असलेल्या हायस्कूलमधील अनेक विद्यार्थ्यांना वायू गळतीचा त्रास झाला होता; मात्र ही वायुगळती नेमकी कुठून व कशामुळे झाली त्याचे कारण गुलदस्त्यात राहिलेले आहे. यासंदर्भात प्रशासनस्तरावर चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे. पण त्या चौकशी समितीचा या वायुगळतीप्रश्नी अहवालाची प्रतीक्षा राहिलेली याचे जिल्हाध्यक्ष सौंदळकर यांनी सांगितले. वायुगळती ही यांत्रिक नसून मानवी चूक असल्याने त्याला मनसेचा कंपनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आक्षेप आहे. पण हा मुद्दा जर दाबण्याचा प्रयत्न झाल्यास मनसे तो हाणून पाडणार असल्याचा इशारा सौंदळकर यांनी दिला आहे.



