Uncategorized

मला खिंडीत पकडणे एवढे सोपे नाही : आमदार भास्कर जाधव

गुहागर : मला खिंडीतपकडणे एवढे सोपे काम नाही. जे पकडतील तेच अडकून पडतील आणि ते या खिंडीत येणार आहेत का ते पहावे, हे कोणीही माझ्या नादाला लागणार नाहीत, असे सूचक वक्तव्य करतानाच माझा मतदारसंघ सुरक्षित आहे. जोडीला विकासाची कामे आहेत. प्रत्येक कार्यकर्ता खंबीर आहे. प्रत्येक गटातील माझे कार्यकर्तेच मेहनत घेतील व मला प्रचंड मताधिक्याने विजयी करतील, असा आत्मविश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार आणि ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.

गुहागर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव उपस्थित होते. ते म्हणाले, मी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला त्याच दिवसापासून माझा प्रचार सुरू झाला आहे व तेथील गर्दी पाहता माझ्या विजयाची पावती आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यांचाही फायदा मला होणार आहे. आमदारकीच्या काळात मी विरोधकांना कधीच त्रास दिला नाही. युतीत असताना चिपळूणातदेखील मला भाजपने मदत केली होती. त्यामुळे आम्ही एकमेकांचे अजूनही मित्र आहोत, त्यामुळे भाजपचे लोकही मला मतदान करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभेला शिंदे सेना, मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र होती. तरीही साडेसत्तावीस हजारांचे मताधिक्य मिळाले. आता मनसे बाजूला गेली तरी याचा फायदा मलाच होणार आहे. येथील लढाई शिवसेना विरुध्द शिवसेना अशी होऊन ही लढाई उध्द्वव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकतर्फी जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुंबई येथे माझी कोकणवासियांची मोठी सभा आयोजित केली आहे. यानंतर मी इतर मतदारसंघात प्रचाराला जाणार आहे. या सर्व सभा आटपून एक, दोन सभा आपल्या मतदारसंघात घ्याव्या का, याची चर्चा मी कार्यकर्त्यांसमवेत करुन निर्णय घेणार आहे. गुहागरमध्ये प्रचाराची यंत्रणा क्षेत्रप्रमुख महेश नाटेकर, तालुकाप्रमुख सचिन बाईत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, महिला तालुका संघटक नेत्रा ठाकूर, प्रवीण ओक या प्रमुख कार्यकर्त्यांच्या खांद्यावर असून अधिक बाकीचे सहकारी त्यांना प्रचारासाठी सहकार्य करतील, असे त्यांनी सांगितले. संघटना मजबूत आहे. युवा सेना मजबूत आहे आणि जोडीला मित्रपक्ष असल्याने माझ्या विजयाची चिंता नाही. यावेळी ५० हजारांचे मताधिक्य मला घ्यायचे आहे. त्याची तयारी आम्ही केली असल्याचे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button