मुख्य बातमीराजकीयविधानसभा निवडणूक २०२४

पक्षनिष्ठा ठरली श्रेष्ठ…. उदय बने यांची माघार

ठाकरे सेनेमध्ये नवचैतन्य : रत्नागिरीत रंगणार धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढत

रत्नागिरी : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने यांची पक्षनिष्ठा श्रेष्ठ ठरली असून, आज (४ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.

उद्या (५ नोव्हेंबर) संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत साळवी स्टॉप येथील जलतरण तलाव येथील मैदानावर पक्षप्रमुखांची विराट सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर बने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्वजण जोमाने कामाला लागले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माझी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने यांनी दुपारी १ वाजून ३६ मिनिटांनी आपला निवडणूक अर्ज मागे घेतला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उद्या होणाऱ्या सभेपूर्वीची ही मोठी घडामोड असून यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जल्लोषी वातावरण निर्माण झाले आहे. बने हे ४५ वर्षे शिवसेनेत कार्यरत आहेत. या विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी मतदारसंघातून ते निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. त्यांच्या मुलाखतीही झाल्या होत्या. या मतदारसंघात ठाकरे शिवसेनेकडून ते उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र मध्येच ३९ वर्षे भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम केलेले ज्येष्ठ नेते बाळ माने यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केल्याने ही उमेदवारी माने यांना देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या बने यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर बाळ माने यांच्यासह ठाकरे शिवसेनेतील ज्येष्ठ पदाधिकारी त्यांच्या सातत्याने संपर्कात होते. श्री. बने यांनी दुपारी माघार घेतली आणि आता ते बाळ माने यांच्या प्रचाराला लागतील. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज आहे व ते माने यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button