अशा लाल मातीतआर्टिकलराजकीयविधानसभा निवडणूक २०२४

कोकणात अनपेक्षित आणि कल्पनातीत विजय!

– अभिजीत हेगशेट्ये

विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊ लागले आणि विजयाच्या अपेक्षेत असणाऱ्या अनेकांना कल्पनातीत विजयाचे आणि अनपेक्षित पराभवाचे धक्के बसू लागले. महाराष्ट्राच्या राजकारणात एक अद्भुत पर्व आकारत असल्याची जाणीव राजकीय समिक्षकांनाही अस्वस्थ करत आहे. भाजपची मुसंडी आणि त्यापाठोपाठ शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (दादा) यांची विजयी घोडदौड ही ढगफुटीत कोसणाऱ्या पावसाच्या आगमनासारखी सर्वसामान्यांना गोंधळून टाकणारी होती. “पैसा झाला खोटा!, या बदली पैसा झाला खरा आणि विजय झाला मोठा” अशीच जणू परिस्थिती. यांतील लाडक्या बहिणीला मिळालेल्या महिन्याच्या बिदागीला बहिणीने दिलेली उत्स्फूर्त साद हीच या निवडणुकीच्या महायुतीच्या अभूतपूर्व विजयाचे गमक आहे.

महायुतीच्या कोकण भागातही अनपेक्षित आणि अनाकलनीय निकालांनी गहजब उडवून दिला आहे. ज्यांना विजयाची शंभर टक्के खात्री होते असे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लाखोंचे हार आणि हजारोंचे फटाके टेम्पो भरून तयारीत ठेवले होते, तर ज्यांना आपला विजय नक्कीच होत नाही तेव्हा त्यांनी कोणतीच तयारी केली नव्हती अशांना अचानक सुखद धक्का बसला आणि प्रश्न पडला इतकी मते मला आली कोठून? साऱ्या महाराष्ट्रातील राजकीय धुरंधर आणि समिक्षकांना हा प्रश्न पडला आहे. याच्या चर्चा सुरू आहे. हरियाणा पॅटर्न नक्की काय हे महाराष्ट्राच्या पुरोगामी लोकशाहीला आता शेठ हळूहळू धारावीच्या विकासासोबत माहित करून देतील असे त्यांचे म्हणणे आहे.

यावेळच्या वैशिष्ट्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच कुटुंबातील दोन भाऊ निवडून आले. “नेपोटीझम” या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथील ट्रेंड कोकणच्या राजकारणात आला आहे. यापुढे तो अधिक स्थिरावेल कारण राजकारणाची आणि मतदारांची गणितेच बदलली आहेत. आर्थिक क्षमता हा एकमेव राजकारणातील सस्टेनेबिलिटीचा आधार राहणार हे या निवडणुकीने अधोरेखीत केले आहे. त्यापुढे अस्मिता, स्वाभिमान, अपमान या पूर्वी कोकण आणि मऱ्हाटी मनाच्या संवेदानात्मक भावनांचे हुंकार आता आकसून गेल्याचे निरीक्षणे येऊ लागली आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात ना. उदय सामंत यांचा विजय हा निश्चितच होता. त्यांच्यासमोर उमेदवार कोण हाच निवडणूक जाहीर होईपर्यंत प्रश्न होता. अखेरच्या क्षणी नक्की काय खेळी झाली हे अजूनही समजले नाही. परंतु भाजपचे आणि आरएसएसचे एकनिष्ठ असणारे अचानक विरोधी विचारसरणीच्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून येतात, हे ही अनाकलनीयच होते. या काळात भाजप गोटात परिवर्तन हा शब्द फार परवलीचा झाला होता! मात्र सलग २० वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे आणि मतदारसंघातील प्रत्येक उपक्रम, बदल आणि घटनांब­द्दल अतीव जागृत असणारे त्याच सोबतीने विकासाचे अनोखे मॅाडेल रत्नागिरी शहर आणि तालुक्यात राबविणारे त्यासाठी सत्ता आणि संधीच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी प्रत्यक्षात आणणारे ना. उदय सामंत यांना निवडणूक अधिक सोपी झाली. ना. सामंत यांचे भाग्य तरी किती अफाट. २००४ पासून ते फक्त एकाच बॅालर सोबत बॅटिंग करतात आणि प्रत्येक वेळी षटकार ठोकत मॅच जिंकतात!

सामंत यांचे बंधुराज किरण सामंत यांची निवडणूक अटीतटीची होती त्यावर स्वतंत्र लिहिणे आवश्यक आहे. तिरंगी लढत असताना आणि मतदारसंघात नव्याने प्रवेश करत असताना त्यांनी जी विजयश्री खेचून आणली ती खास दाद देणारी आणि त्यांच्या राजकीय धुरंधरतेची विशेष नोंद घेणारी आहे.

चिपळूणचे शेखर निकम यांना प्रशांत यादव यांनी फारच तगडे आव्हान उभे केले होते. ना. शरद पवार यांच्या चिपळूण येथील प्रचंड सभेनंतर पारडेच बदलले होते. ना. शरद पवार यांना अखेरच्या क्षणी सोडून जाणे हे योग्य नाही ही भावनिक हाक कोकणी हळव्या मनाला साद घालून गेली. प्रशांत यादव यांचे वाशिष्ठीच्या माध्यमातून उभारलेले काम आणि सोबत ना. शरद पवार यांचा भावनिक ओलावा आणि चिपळूण शहर आणि देवरुख येथील बदललेले वातावरण यात ही निवडणूक अधिक कडवी झाली; मात्र शेखर निकम यांनी गावागावात केलेल्या कामांची नोंद विशेषतः संगमेश्वर तालुक्यातील लोकांनी जागृत ठेवली. आर्थिक उलाढालीत हा मतदारसंघ राजापूर, रत्नागिरीप्रमाणेच कमी राहिला नाही; मात्र अखेरचा शिक्का आमदार म्हणून केलेले काम आणि लाडकी बहीण यांचे पारडे अखेरच्या टप्यात अधिक जड होत गेले.

गुहागरमध्ये भास्कर जाधव यांचा विजय हा काळ्या दगडावरील पांढरी रेष असाच मानला जात होता. विजय मिळाला परंतु बेंडल यांना मिळालेली मते आणि येथे झालेली अटीतटीची अनपेक्षित लढत ही राजकीय निरीक्षक, परीक्षक आणि अभयासक यांना संभ्रमित करणारी अनाकलनीय होती. मतपेटीत कोणी घुसखोरी करत आहे का? अशा शंका राज्यातील विविध भागात व्यक्त होऊ लागल्या आहेत. लोकशाहीच्या पारदर्शक तत्वालाच धक्का देणारे आहे. आपल्या मतदारसंघात प्रचाराला जाण्याची गरज नाही, असे सांगणाऱ्या जाधव यांना मतपेटीच्या निर्णयात अखेरपर्यंत झुंजावे लागले होते.

दापोली मतदारसंघात शिवसेना उबाठाचे संजय कदम यांना त्यांच्या विजयाची इतकी खात्री होती की त्यांनी मतदान संपल्यावर चक्क विजयी मिरवणूक साजरी केली; मात्र प्रत्यक्षात त्यांना योगेश कदम यांच्यासमोर २४ हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला.

या निवडणुकीवर लाडकी बहीणीचा प्रभाव होता; परंतु त्याहीपेक्षा अधिक प्रभाव होता तो पैशाच्या उधळणीचा. एका मतासाठी पाच ते दहा हजारांपर्यंत रक्कम खर्च होणे हे कोकणसाठी अचंबित करणारे होते. दुसरा परिणाम होता मुंबईतील चाकरमान्यांच्या मतांचा. कोकणात आज कोणताही रोजगार नाही. येथील प्रत्येक वाडीतील तरुण मुले-मुली १० वी १२ वी नंतर मुंबई-पुण्यात जातात. गावाला फक्त गणपती शिमग्याला येतात; मात्र यावेळी या मतदारांना झाडून आणण्यात आले होते. काही गावांत स्थानिक मतदान ३००, तर मुबंईतून आलेल्या बसमधील मतदान ५०० अशी परिस्थिती होती. हे सारे मन सुन्न करणारे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button