मुख्य बातमी

राजापूर, संगमेश्वरमध्ये सादर होणार “संगीत बिबट आख्यान” नाटिका

रत्नागिरी वन विभाग आणि डब्लूसीएस-इंडिया, रेनमॅटर फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजन

रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये मानव आणि वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढत आहेत; मात्र वन्यजीवांचे मानवी जीवनात किती महत्त्व आहे हे पटवून देण्यासाठी विभागीय वनाधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी व चिपळूण वन विभाग आणि डब्लूसीएस-इंडिया, रेनमॅटर फाऊंडेशन यांच्या वतीने “संगीत बिबट आख्यान” ही नाटिकेचे सादरीकरण केले जाणार आहे.

उद्या (२५ फेब्रुवारी) दुपारी ३ ते सायंकाळी ६ यावेळेत ग्रामपंचायत सभागृह, मु.पो. केळवली (ता. राजापूर) येथे, तर २६ फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र मार्लेश्वर, वाहनतळ परिसर, मु.पो. मारळ (ता. संगमेश्वर) येथे सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत हे आख्यान होणार आहे. हे नाटक विनामूल्य असून, यावेळी स्थानिक गावकरी, विद्यार्थी, निसर्गप्रेमी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी वन विभागामार्फत करण्यात आले आहे.

“संगीत बिबट आख्यान” विषयी कलेच्या माध्यामातून वन्यप्राण्यांविषयी जनजागृती करण्यासाठी सिताई क्रिएशन्सने ‘वन्यवाणी’ ही चळवळ सुरू केली आहे. त्यामधील “संगीत बिबट आख्यान” ही एक नाट्याकृती आहे. या नाट्याकृतीच्या निर्मित्या कुणिका बनसोडे-सावंत या असून लेखक-दिग्दर्शनाची धुरा मकरंद सावंत यांनी सांभाळली आहे. रोमांचक कथा आणि लोकसंगीताच्या माध्यमातून मानव-बिबट संघर्षावर हे नाटक भाष्य करते. कोकणातील तरुणांनी या नाटकाची निर्मिती केली आहे.

या कार्यक्रमासाठी वन विभागाच्या विभागीय वनाधिकारी श्रीमती गिरीजा देसाई, रत्नागिरीच्या सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियांका लगड, डब्लूसीएस-इंडियाच्या संचालक डाॅ. विद्या अत्रेय, मानव-वन्यजीव सहसंबंध विभागाचे मॅनेजर निकीत सुर्वे, दीप्ती हमरसकर आणि पर्यावरण पत्रकार अक्षय मांडवकर यांचे सहकार्य लाभले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button