मुख्य बातमी

कोकणातील शेतकरी मच्छिमारांच्या प्रश्नासाठी समृध्द कोकणचे भू येथे बेमुदत उपोषण

राजापूर : समृद्ध कोकण संघटनेच्या वतीने गुरूवारपासून (२२ ऑगस्ट) तालुक्यातील भू येथे बेमुदत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. कोकणातील शेतकरी व मच्छिमारांचे प्रश्न सुटत नाहीत तसेच शेतकरी व मच्छिमारांना योग्य तो हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा समृद्ध कोकण स्वराज्य भूमी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

कोकणातील शेतकरी, बागायतदार, मच्छीमार, पर्यटन विकास या न्याय हक्कासाठी व मागण्यांसाठी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समृद्ध कोकण संघटना अध्यक्ष संजय यादवराव यांच्या नेतृत्वाखाली हे स्वराज्यभूमी आंदोलन हाती घेण्यात आले आहे. शासनाने आमच्या मागण्याची दखल घेतली नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला जाईल, असा इशारा संजय यादवराव यांनी दिला आहे.

गुरुवारी (२२ ऑगस्ट) सकाळी १० वाजल्यापासून हे साखळी उपोषण आंदोलन सुरू झाले असून, ते तीन दिवस म्हणजेच २४ ऑगस्टपर्यंत भू, खिणगिणी या गावांमध्ये आंदोलन सुरू राहणार आहे. २६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून, या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण छेडण्यात येणार आहे.

जोपर्यंत मच्छीमार व शेतकरी संघटनेच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असून या आंदोलनाचा सरकारने योग्य तो विचार केला नाही, तर मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर शेतकरी व मच्छीमार संघटनेच्या वतीने बहिष्कार टाकण्यात येईल, असा देखील इशारा समृध्द कोकण संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात भू दशक्रोशीतील शेतकरी, बागायतदार, मच्छीमार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

राज्यात ऊस, कापूस, सोयाबीन यांसह अन्य पिके धोक्यात आली की शासन तात्काळ त्याची दखल घेते व त्यांना घसघशीत परिपूर्ण मदत देते, तथापी कोकणातील आंबा, काजू पिकांसह मासेमारीवर संकट आले की शासन लक्ष देत नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांमधून करण्यात आला. कोकणातील समस्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यात आले असून तात्काळ मदत द्या, अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांमधून करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button