परभणी संविधान प्रतीकृतीची विटंबना प्रकरणी राष्ट्रविरोधी कायद्यानुसार कारवाई करावी
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी : परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रतिकृती प्रत ठेवण्यात आली होती. एका माथेफिरूने संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना केली. संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर परभणी शहरासह आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, जिल्ह्यातील संविधानवादी जनतेच्या वतीने तसेच आंबेडकरी समाज आणि वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी जिल्ह्याच्या (दक्षिण) वतीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा, तालुकास्तरावर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने निवेदने सादर करण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीने देखील रत्नागिरीत यापूर्वी घडलेल्या घटनांचा उल्लेख करत परभणी येथील भारतीय संविधान प्रतिकृतीची जातीयवादी द्वेषातून करण्यात आलेल्या घटनेचा रत्नागिरी जिल्ह्यातील संविधानवादी जनतेच्या वतीने तसेच आंबेडकरी समाज आणि वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी जिल्ह्याच्या (दक्षिण) वतीने तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच संबंधित गुन्हेगाराने संविधानाच्या प्रतीकृतीचा अवमान करून राष्ट्र विरोधी कृत्य केले आहे आणि त्या गुन्हेगारा विरोधात राष्ट्रविरोधी कायद्यानुसार कटोरपणे कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन १३ डिसेंबर रोजी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन विभाग) श्री. बोरकर यांच्याकडे देण्यात आले.
यापुढे, राष्ट्र निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जातीय द्वेष भावनेतून रत्नागिरी जिल्ह्यात देखील यापूर्वी अनेकदा अवमानाच्या अनुचित घटना घडल्या आहेत. अथवा घडवून आणल्या गेल्या आहेत. मग ते जीएसटी कार्यालयाच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तस्विरीची करण्यात आलेली विटंबना असो अथवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा आवारात करण्यात आलेली नासधूस असो. या सर्व प्रकरणांत एकतर पोलीस प्रशासनाला याचा छडा लावण्यात अपयश आले आहे. अथवा पोलीस प्रशासनानेच आरोपींना मानसिक रूग्ण ठरवून या अनुचित घटनांकडे दुर्लक्ष केले आहे. एकाही आरोपीला कायद्याच्या चौकटीत योग्य ते शासन झालेले नाही. ज्यामुळे असे प्रकार करणाऱ्यांना, घटना घडवून आणणाऱ्यांचे मनोधैर्य वाढले आहे. जे सामाजिक धार्मिक सलोख्यासाठी धोकादायक ठरणारे आहे. असे निवेदन नमूद करण्यात आले आहे.
परभणी येथे घडलेली राष्ट्र विरोधी, समाज विरोधी अनुचित घटना लक्षात घेऊन तसेच रत्नागिरी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आजवर झालेल्या अवमानाच्या घटनांची दखल घेऊन रत्नागिरी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण आपल्या अधिपत्याखाली योग्य ती व्यवस्था, कारवाई करावी, अशी मागणी रत्नागिरी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.
परभणी घटनेतील आरोपीला कठोरातील कठोर कारवाई करून अन्य आरोपीचा शोध घ्यावा. अशा समाज विघातक वृत्तींना पायबंद घालण्यात यावा आणि सामाजिक शांतता, सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यात यावे, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सादर केलेले निवेदन उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन विभाग) श्री. बोरकर यांनी स्वीकारले. यावेळी वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी जिल्हा व तालुका पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष लवेश कांबळे, जिल्हा महासचिव मुकुंद सावंत, तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, तालुका महासचिव प्रतीक कदम, राजेंद्र जाधव, यशवंत सावंत, सचिव बिपीन आयरे, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार विभाग प्रमुख विजय जाधव, महासभेचे माजी तालुकाध्यक्ष रत्नदीप कांबळे आदी उपस्थित होते.



