रत्नागिरीतील नवग्रह मंदिरातील नवग्रह नवकुंडी प्राणप्रतिष्ठा सोहळा १५ फेब्रुवारी रोजी होणार
श्री गजानन महाराज (शेगांव) स्मृतीमंदिर समितीतर्फे आयोजन : विविध धार्मिक कार्यक्रम

रत्नागिरी : शहरातील नाचणे रोडवरील पॉवर हाऊस जवळील श्री गजानन महाराज मंदिराच्या आवारात नवग्रह मंदिर नव्याने बांधण्यात आले असून १५ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत नवग्रह नवकुंडी प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत श्री गजानन महाराज मंदिरात प्रगटदिन सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती श्री गजानन महाराज (शेगांव) स्मृतीमंदिर समितीचे संस्थापक अध्यक्ष म. वा. देसाई यांनी दिली.
नाचणे येथील श्री गजानन महाराज मंदिरात आज (१३ फेब्रुवारी) आयोजित पत्रकार परिषदेचे बोलत होते. यावेळी प्रवीण उर्फ अण्णा कवितके उपस्थित होते. यावेळी माहिती देताना श्री. देसाई म्हणाले, नवग्रह नवकुंडी प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच गजानन महाराज प्रकट दिन सोहळा या निमित्ताने १५ ते २० फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याची सुरूवात १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता समितीतील महिलांच्या हस्ते नवग्रहांवर जलस्नानाच्या मोठ्या कार्यक्रमाने होणार आहे.

दिनांक १५ ते २० फेब्रुवारी या कालावधीत श्री गजानन महाराज मंदिरात होणारे विविध धार्मिक कार्यक्रम असे : १५ फेब्रुवारी सकाळी ७ ते ८ या वेळेत श्रींची पंचामृती पूजा, सकाळी ८ ते दुपारी १ यावेळेत पुण्यवाहन, देवतास्थापन, जलाधिवास, शतकलश स्नानविधी, दुपारी ३ ते ४ यावेळेत ग्रामदैवत श्री कालभैरव (भैरी) याला आमंत्रण, सायंकाळी ४ ते ७ यावेळेत मारुती मंदिर ते श्री गजानन महाराज मंदिर अशी नवग्रहांची मिरवणूक.
१६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी १ यावेळेत देवतापूजन, वास्तूशांती, होम हवन, दुपारी ३ ते ४ यावेळेत अथर्वशीर्ष आवर्तने, सायंकाळी ४ ते ७ यावेळेत वास्तुभूषण, ज्योतिष, हस्तरेषा तज्ञ संजय रानडे यांचे “मानवी शरीरावर ग्रहांचे परिणाम” या विषयावर प्रवचन होईल.
१७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी १ यावेळेत श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य शंकेश्वर (करवीर) सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना, पूजांगहवन, कलशारोहण व पूर्णाहुती कलशारोहण होईल. दुपारी १ ते ३ यावेळेत महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ७ यावेळेत संजय रानडे यांचे प्रवचन. त्यानंतर आरती आणि प्रसाद.
१८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत पंचामृती पूजा, सकाळी ८ दुपारी १ यावेळेत गणेश याग, सायंकाळी ४ ते ७ यावेळेत “स्वरनिनाद” प्रस्तुत संगीतकार विजय रानडे यांचा “स्वरविजय” हा गायनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ७ वाजता आरती नंतर पालखी प्रदक्षिणा होईल.
१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ८ यावेळेत पंचामृती पूजा, सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत भक्तांचे ‘श्रीं’वर अभिषेक, सायंकाळी ४ ते ६.३० वाजता हभप डॉ. सौ. प्रज्ञा देशपांडे – पळसोदकर यांचे “माणकोजी बोधले” याविषयावर कीर्तन होईल.
२० फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते ८ या वेळेत पंचामृती पूजा, सकाळी ६ ते दुपारी १२ यावेळेत श्री दासगणूविरचित “श्री गजानन विजय” ग्रंथाचे सामुदायिक पारायण, सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत भक्तांचे श्रीं’वर अभिषेक, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ५ यावेळेत उपासना, सायंकाळी ४ ते ९ यावेळेत तीर्थ प्रसाद, सायंकाळी ६.३० ते ७.३० यावेळेत कृतज्ञता, सत्कार समारंभ आणि रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा होऊन कार्यक्रमाची समाप्ती होईल.
नवग्रह नवा कुंडी प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा निमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी, असे आवाहन श्री गजानन महाराज (शेगांव) स्मृती मंदिर समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. देसाई यांनी केले आहे.



