मुख्य बातमी

आग विझवण्याचे संयंत्र नसलेल्या बसेसवर होणार कारवाई

सहा.उप-प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आदेश : भाजपचे जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे यांच्या प्रयत्नांना यश

रत्नागिरी : भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे यांनी सहाय्यक उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांची भेट घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये असलेल्या गंभीर त्रुटींबाबत माहिती देऊन कारवाई करण्याची मागणी केली. ही बाब गंभीरपणे घेत अशा बसेसवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश श्री. ताम्हणकर यांनी दिले आहेत.

एस. टी. महामंडळाच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसमधील गंभीर त्रुटींबाबत सुमारे दीड वर्षापूर्वी याबाबत रत्नागिरीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांना पत्र दिले होते; यात जवळ जवळ सर्व बसेसमधे आग विझवण्याचे संयंत्र नसल्याची बाब विभाग नियंत्रकांच्या निदर्शनास आणून दिली होती; परंतु विभाग नियंत्रक यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. म्हणून भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे यांनी सहाय्यक उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांना भेटून जवळ जवळ सर्व बसेसमधे आग विझवण्याचे संयंत्र नसल्याचे किंवा कालबाह्य असल्याबाबत कारवाई करण्याचे पत्र दिले व चर्चा केली.

तीन प्रवासी असणाऱ्या रिक्षावर संयंत्र नसेल, तर त्वरित कारवाई होते. मग बसेसवर का नाही, असा सवाल उपस्थित करत प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा बसेसवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. सहा.उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. ताम्हणकर यांनी ही बाब गंभीरपणे घेत अशा बसेसवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश काढले. या वेळी भाजपा पदाधिकारी प्रशांत सनगरे उपस्थित होते.

बसमधून प्रवास करताना त्या बसमध्ये आग विझवण्याचे संयंत्र नसल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आल्यास त्यांनी तत्काळ तक्रार करावी, असे आवाहन सहाय्यक उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. ताम्हणकर यांनी यावेळी केले. पत्राची दखल त्वरित घेतल्याबद्दल सतेज नलावडे यांनी ताम्हणकर यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button