शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार बाळ माने यांचे रत्नागिरी जंगी स्वागत

रत्नागिरी : गेली ४० वर्षे भारतीय जनता पक्षामध्ये काम करणाऱ्या सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी काल (२३ ऑक्टोबर) शिवबंधन बांधल्यानंतर आज यांचे रत्नागिरी रेल्वे स्थानकावर शिवसेनेतर्फे (ठाकरे गट) जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेली ४० वर्षे भाजपमध्ये काम करणाऱ्या बाळ माने यांनी १९९९ साली प्रथम विधानसभा निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले. त्यानंतर त्यांचा पराभव झाला, तरीही ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून वारंवार रत्नागिरी मतदारसंघाची मागणी करण्यात आली. परंतु कोकणात भाजपाने २०१९ प्रमाणेच २०२४ मध्ये एकही मतदारसंघ भाजपला दिला नाही. त्यामुळे माने यांनी मातोश्रीवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काल माजी खासदार विनायक राऊत, सौ. माधवी माने, मुलगे मिहिर व विराज माने, भास्कर जाधव यांचे सुपुत्र समीर जाधव यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला.
आज सकाळी ते रत्नागिरीत दाखल झाले. यावेळी ठाकरे सेनेच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, माजी शहर प्रमुख प्रमोद शेरे यांच्यासह रिक्षा सेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





