Uncategorized

वीर रत्न बाजीप्रभू या ऐतिहासिक नाट्यकृतीचा कोकण दौरा

रत्नागिरी : “शाळा, शैक्षणिक व सामाजिक निधी संकलनासाठी वीर रत्न बाजीप्रभू या ऐतिहासिक नाट्यकृतीचा कोकण दौरा १२ ते १५ मे या कालावधीत होणार आहे. या दोन अंकी नाटकाची निर्मिती आणि सादरकर्ते श्री महालक्ष्मी कलामंच मुंबई असून, राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ मुंबई यांच्या सहकार्याने होत आहे,” अशी माहिती राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी काल (ता. १०) पत्रकार परिषदेत दिली. या वेळी शौकत गोलंदाज, भार्गव घाग, दिगंबर शिंदे उपस्थित होते.
या विषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, “आपल्या कोकणाला ऐतिहासिक, पौराणिक नाटकांची परंपरा आहे; मात्र आजच्या घाडीचा विचार केला तर हा इतिहास पुढच्या पिढीकडे ज्या तऱ्हेने जायला पाहिजे तसा जात नाही हे लक्षात आले आहे. हल्ली घरात आजी-आजोबाच नसल्याने पौराणिक, ऐतिहासिक कथा आजच्या मुलांना माहिती नाहीत म्हणून राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाने या नाटकासाठी पुढाकार घेतला आणि त्याचे कोकण दौरा आयोजित केला आहे. दि. १२ मे रोजी वेरळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, १३ मे पाचल येथील माजी विद्यार्थी रंगमंच, १४ मे रोजी रत्नागिरीतील स्वा. सावरकर नाट्यगृह तर १५ मे रोजी लांजा येथील विद्यार्थी रंगमंच येथे रात्री ९ वाजता हे नाटक होईल.”
या नाटकाचे लेखन विद्याधर शिवणकर यांनी केले असून, दिग्दर्शन प्रकाश लाड यांचे आहे तर योगेश यांचे संगीत आहे. संजय मांडवकर हे सूत्रधार आहेत. नितीन बैकर यांची प्रकाशयोजना आहे, रंगभूषा उलेश खंदारे, वेशभूषा नाना शिंदे, नेपथ्य अशोक पालेकर आणि मंडळी यांचे आहे. सहाय्यक विनायक धामणे असून, प्रकाश व ध्वनी योजना दत्ता गाडे यांचे आहे, तर माहेदर साळवी आणि मंगेश चव्हाण यांनी संयोजन केले आहे. या नाटकाला जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ मुंबईचे अध्यक्ष सुभाष लाड यांच्यासह शौकत गोलंदाज, भार्गव घाग, दिगंबर शिंदे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button