मुख्य बातमी

रत्नागिरीत ३ ते ५ जानेवारीदरम्यान रंगणार संगीत नाट्य महोत्सव

एनसीपीए आणि खल्वायन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

रत्नागिरी : मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट सेंटर (एनसीपीए) आणि रत्नागिरीच्या सांस्कृतिक विश्‍वात गेली २८ वर्षे सातत्याने संगीत आणि नाट्यक्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या खल्वायन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी शहरात प्रथमच तीन दिवशीय संगीत नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीच्या वातानुकुलीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ३ ते ५ जानेवारी २०२५ दरम्यान संगीत नाट्य महोत्सव रंगणार आहे.

शुक्रवारी (३ जानेवारी) रोजी सायंकाळी ७ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन मान्यवराच्या हस्ते होणार आहे. या दिवशी ५९ व्या राज्य नाट्य महोत्सवात १० वैयक्तिक पारितोषिकांसहित प्रथम क्रमांक मिळविलेल्या संगीत ताजमहाल या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. मुंबईचे प्रसिध्द हार्मोनियम वादक व संगीतकार डॉ. विद्याधर ओक यांनी लिहिलेले व संगीत दिलेले हे नाटक एका ऐतिहासिक सत्याच्या पार्श्‍वभूमीवरील नवे कोरे संगीत नाटक आहे. देखणे नेपथ्य, बहारदार गायकी, भरजरी वेशभूषा, शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, भावसंगीत आणि कर्नाटक संगीतातील नवीन रागावर आधारीत नव्या चालीच्या मधुर नाट्यपदांनी हे नाटक नटलेले आहे.

शनिवारी (४ जानेवारी) सायंकाळी ७ वाजता रत्नागिरीचे प्रसिद्ध कादंबरीकार आणि नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरलेले आणि ६२ व्या राज्य नाट्य महोत्सवात ८ वैयक्तिक पारितोषिकांसहित तृतीय क्रमांक मिळविलेल्या संगीत अमृतवेल या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. सुमारे सातशे वर्षांपूर्वीपासून सामाजिक विषमतेच्या गर्तेत सापडलेल्या समाजाला सन्मार्गावर आणण्यासाठी संतांनी आपले आयुष्य वेचले, त्या महान विभूतींमध्ये संत चोखामेळा यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागते. त्यांच्या जीवनाचा अभ्यास करतांना त्यांनी लिहिलेले अभंग, त्यांनी सोसलेल्या यातना आणि विठ्ठलावरची अतूट निष्ठा यातून त्यांची सामाजिक एकते संदर्भातील अमृतवेली सारखे योगदान, त्यांचे नाट्यमय जीवन चरित्र या नाटकातून मांडले आहे. फिरते नेपथ्य, बहारदार गायकी असलेल्या नव्या चालीच्या सुमधूर नाट्यपदांनी हे नाटक नटलेले आहे.

दिनांक ५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता कै. प्रा. वसंत कानेटकर यांचे सुप्रसिद्ध नाटक संगीत मत्स्यगंधा या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. महाभारतातील कथाभागातील एक पान सत्यवती आणि भीष्म यांच्यातील संघर्ष. खल्वायनच्या ज्येष्ठ कलावंतांचा कसदार अभिनय, नवीन तरुण तडफदार कलावंतांच्या गायकीतून सादर होणारी देवाघरचे ज्ञात कुणाला, गुंतता र्‍हदय हे, नको विसरु संकेत मिलनाचा, गर्द सभोती रान साजणी यासारख्या सुमधूर पदांनी हे नाटक नटलेले आहे.

तीनही संगीत नाटकांचे दिग्दर्शन मनोहर जोशी यांनी केले आहे. यामध्ये रत्नागिरी, चिपळूण, देवगड, मुंबई, बीड, पुणे येथील प्रसिध्द कलावंतांबरोबरच सावनी पाटेकर, सावनी शेवडे, श्रेयस व्यास, लक्ष्मीप्रसाद पटवारी हे प्रसिध्द तरुण कलावंत भूमिका करणार आहेत. ३० डिसेंबरपासून दररोज सकाळी ९ ते सायं ८ या वेळेत सीझन तिकीटांची आगावू विक्री सुरू झाली आहे.

रत्नागिरी व परिसरातील संगीत नाट्य रसिकांना हा महोत्सव म्हणजे एक पर्वणी आहे. या महोत्सवातील नाटकांचा आस्वाद सर्व संगीत रसिकांनी घ्यावा, असे आवाहन एनसीपीए आणि खल्वायनचे अध्यक्ष मनोहर जोशी, कार्यवाह प्रदीप तेंडुलकर व खजिनदार श्रीनिवास जोशी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button