जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोघे ताब्यात
खेड पोलिसांची सुरत येथे कारवाई

खेड : शहरातील एका तरुणाची २४ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांच्या मुसक्या आवळल्या. जिम्मीभाई सुनीलभाई भगत (४०, रा. गलेमांडी-सुरत), सोनू रामलाल टेलर (२४, रा. दिनोडली-सुरत) अशी दोघांची नावे आहेत. त्यांना गुरुवारी (१२ सप्टेंबर) सुरत येथून ताब्यात घेण्यात आले.
या फसवणूक प्रकरणातील आरोपींची संख्या ४ झाली असून, यातील दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. ‘एआरके इन्व्हेस्टमेंट ग्रुप’ या व्हॉटस्अप ग्रुपवरून ट्रेडिंग संदर्भातील संदेश पाठवत कंपनीत पैशांची गुंतवणूक केल्यास जादा रक्कम परतावा देण्याचे आमिष दाखवत येथील एका तरुणाची २४ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. हा गुन्हा १९ एप्रिल ते २५ मे २०२४ या कालावधीत घडला होता. खेड पोलिसांनी यापूर्वी नीरज महेंद्र नांगरा (२२, चंढीगड-हरियाणा) याला गजाआड केले होते. सखोल चौकशीअंती आणखी एकाचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर नारायणलाल जोशी (४२, सध्या रा. सुरत-गुजरात, मूळगाव उदयपूर-राजस्थान) यालाही गजाआड केले होते. या भामट्याची सखोल चौकशी केल्यानंतर आणखी दोघांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी राजन सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीनुसार आणखी दोन भामट्यांना बेड्या ठोकल्या. दोघांकडून ४० हजार रुपये किंमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे. या पथकात हेडकॉन्स्टेबल दीपक गेरे, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बांगर, वैभव ओहोळ, रमिज शेख, नीलेश शेलार, सायबर क्राईमचे सौरभ कदम यांचा समावेश होता.



