मुख्य बातमी

जिल्हा पोलीस दलाकडून आंबा बागायतदार, बोट मालकांची बैठक

रत्नागिरी : १ सप्टेंबरपासून जिल्हाभरात व्यावसायिक मच्छीमारीला प्रारंभ होत आहे. त्यासाठी येणारे नेपाळी खलाशी, आंबा बागेत काम करणारे नेपाळी कामगार, चिरेखणीवर काम करणारे परराज्यातील कामगार यांची माहिती पोलिसांकडे असावी. या उद्देशाने आंबा बागायतदार आणि बोट मालक यांची संयुक्त बैठक आज (१० ऑगस्ट) रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत घेण्यात आली. यात जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

पोलीस कवायत मैदानावर झालेल्या या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उप अधीक्षक राधिका फडके, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्यासह आंबा बागायतदार आणि बोट मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी या बैठकीत आंबा व्यापाऱ्यांनी पोलिसांकडून घातली जाणारी गस्त फायदेशीर असून, या काळात ती वाढवावी असे सांगितले. या कामगारांमुळे आम्हालाही काही अडचणी येतात; पण त्या अडचणीवर मात करत पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले. सीसीटीव्ही बसविणे, ओळखपत्र देणे असे काही महत्त्वाचे मुद्देही आंबा व्यापाऱ्यांकडून मांडण्यात आले.

या बैठकीत बोट मालक सुद्धा उपस्थित होते. त्यांनी सुद्धा यावेळी त्यांच्या अडचणी पोलिसांना सांगितल्या. नेपाळ लोकं खलाशी म्हणून आमच्याकडे येत असतात; मात्र त्यांचे मोबाईल नंबर हे बाहेरचे असतात अशावेळी त्यांना संपर्क करणे शक्य होत नाही. यासाठी आपल्याला काही करता येईल का अशी विचारणा बोट मालकांनी यावेळी केली आहे. यावर प्रशासन नक्की विचार करेल असं पोलीस दलाकडून सांगण्यात आले आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड म्हणाल्या, महाराष्ट्र शासनाने दिलेला कलर कोड आपल्या बोटवर असणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी जे सिस्टीम लावायला सांगितले, त्याही बोटवर असणे आवश्यक आहे. बोटीवर असलेल्या सर्व खलाशांची माहिती ही तुमच्याकडे आणि प्रशासनाकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. आपली बोट घेऊन खलाशी समुद्रात जात असतात. काहीवेळा संशयास्पद हालचाली, गोष्टी तुम्हाला दिसतात. त्याची माहिती तुम्ही पोलिसांना देणे बंधनकारक आहे.

काहीवेळा खलाशी बोटीतून पाण्यात पडून त्याचा मृत्यू होतो. त्यांचा मृतदेह कधी दोन दिवसांनी, कधी तीन दिवसांनी कुठेतरी समुद्राच्या किनारी येतो . अशावेळी त्याला शोधणं किंवा त्याची माहिती मिळवणे कठीण होते. म्हणूनच त्यांची माहिती तुमच्याकडे आणि पोलीस दलाकडे असेल, तर अशी काही घटना घडली तर त्याचा शोध लावायला वेळ लागत नाही, असे श्रीमती गायकवाड म्हणाल्या.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनीही आंबा बागायतदार आणि बोट मालकांना मुद्देसुद मार्गदर्शन करून कोणत्याही प्रकारच्या अडचणीत ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले. या बैठकीला रत्नागिरीसह राजापूर, लांजा, संगमेश्वर बाणकोट, गुहागर, चिपळूण, दापोली याठिकाणाहून असे येथे मच्छीमार आंबा व्यापारी सुद्धा उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button