मुख्य बातमी

देवरुख येथे २८ डिसेंबर रोजी वसुंधरा मित्र संमेलनाचे आयोजन

परिसंवाद, विविध प्रदर्शन, आंतरशालेय स्पर्धा यांबरोबरच वसुंधरा मित्र पुरस्काराचे वितरण

रत्नागिरी : सृष्टीज्ञान संस्था, सह्याद्री संकल्प सोसायटी आणि आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय यांच्यावतीने २८ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ यावेळेत ‘वसुंधरा मित्र संमेलन २०२४’चे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन देवरुखमधील (ता. संगमेश्वर) आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेजच्या स. का. पाटील सभागृह होणार आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यातील जन- वन आणि वन्यजीवांचे सहजीवन अशी या संमेलनाची संकल्पना आहे.

सृष्टीज्ञान संस्था आणि सह्याद्री संकल्प सोसायटी गेली अनेक वर्षे संगमेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्लेश्वर परिसरातील सह्याद्रीच्या डोंगर खोऱ्यात पर्यावरण वनसंवर्धन, शाश्वत सेंद्रिय शेती, जनआरोग्य आणि धनेश पक्षी आदी वन्यजीव संवर्धनाचे आणि कृतीप्रवण संशोधनाचे काम करीत आहे. या कामात देवरुखमधील आठल्ये-सप्रे- पित्रे महाविद्यालयाचाही सक्रिय सहभाग आहे.

या भागातील गावांमध्ये अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले गेले आहेत. या उपक्रमांमधून साध्य झालेले संचित मांडण्यासाठी वसुंधरा मित्र संमेलन आयोजन केले जात आहे. त्याचबरोबर सह्याद्रीच्या खोऱ्यातील जनजीवन जंगल आणि वन्यजीवांचे अस्तित्व यांमधील आव्हाने आणि मार्ग याबाबत परिसंवाद यावेळी होणार असून, याविषयी काम करणाऱ्या गुणीजनांचा या संमेलनात “वसुंधरा मित्र पुरस्कार” देऊन सन्मान केला जाणार आहे.

यानिमित्ताने २७ आणि २८ डिसेंबर रोजी सेंद्रिय शेती, वन संवर्धन, सड्यांचे महत्त्व, दरडमुक्त सह्याद्रीसाठी जल-जंगल-जमिनीचे व्यवस्थापन, आदी विषयांवर आंतरशालेय प्रकल्प मॉडेल प्रदर्शन आणि स्पर्धा घेण्यात येणार आहे. संमेलनाच्या ठिकाणी पारंपरिक शेतकरी महिला नृत्य, धनेश गरुड सेल्फीपॉईंट व वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन, पारंपरिक बियाणी, कंदमुळे, सेंद्रिय नाचणी व हरिक धान्ये, बाँबूचे दागिने, पर्यावरणपूरक उत्पादने आदींचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे.

या संमेलनासाठी २८ डिसेंबर रोजी प्रमुख पाहुणे म्हणून चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम तसेच महाएमटीबीचे संपादक किरण शेलार उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाला निसर्गप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशांत शिंदे, प्रतीक मोरे, डॉ. शार्दुल केळकर, डॉ. प्रताप नाईकवाडे, कुणाल अणेशव, अभिजीत पाटील आणि केतकी फाटक यांनी केले आहे.

संपर्कासाठी क्रमांक : ९५९४२७१५११, ७७९८२३३२४३, १५९५८२१८११, ९१६०४६०६३३, ९९६०५५७५५९, ७७९६५५११११, ९८५०८६६१६१

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button