गांधीची नैतिकता, साने गुरुजींचे प्रेम आणि विनोबा भावे यांची शस्त्रकाट्याची कसोटी यांचे अनोखे मिश्रण म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर ! — अतुल देऊळगावकर

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १ नोव्हेंबर रोजी असलेल्या जन्मदिवसानिमित्त पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांचे “पर्यावरणाचे प्रश्न आणि विवेकी जीवनशैली” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. १ नोव्हेंबर हा दिवस विवेक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या प्रसंगी अंनिस कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अलीकडेच मराठवाडा आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या व्यक्ती, कुटुंब व गावांप्रती संवेदना प्रकट करण्यात आली. अशा पर्यावरणाच्या आणि वातावरण बदलाच्या संकटाला तोडं देण्यासाठीच विवेकी जीवनशैली आणि पर्यावरणाचे वैज्ञानिक भान आवश्यक आहे या दृष्टिकोनातून या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
अतुल देऊळगावकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध गुण आणि स्वभाव विशेष याबद्दल डॉ . दाभोलकर ज्या काळात जगले त्यावेळच्या आव्हानांच्या संदर्भातील आठवणी सांगून उजाळा दिला. आजच्या काळातील पर्यावरणाचे प्रश्न सोडवणे हे विवेकी जीवन जगण्याच्या ध्येयापासून वेगळे केले जाऊ शकत नाही यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले, “गांधीची नैतिकता, साने गुरुजींचे प्रेम आणि विनोबा भावे यांची शस्त्रकाट्याची कसोटी यांचे अनोखे मिश्रण म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर !”
“सन १९९० च्या दशकात जागतिकीकरण आणि आत्मकेंद्रितपणा वाढीस लागला त्याच काळात डॉ. दाभोलकर हे जगाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना स्वतःच्या कृतीतून काय उत्तर देता येईल याविषयी वेगवेगळे प्रयोग करत होते. दिल्लीतील गंभीर हवा-प्रदूषणाचा प्रश्न असो, आजकालचे नद्यांचे प्रदूषण असो या विषयावर त्यांनी सुरू केलेल्या फटाकेमुक्त दिवाळी तसेच गणेशमूर्ती – निर्माल्य यांचे कृत्रिम हौदात विसर्जन या काळाच्याही पुढे असलेले उपाय कृतीत आणून आपल्या द्रष्टेपणाचा दाखला दिला होता,” असं देऊळगावकर पुढे म्हणाले.
देऊळगावकर यांनी जगभरच्या पर्यावरण चळवळी, सामाजिक चळवळी आणि मानवतावादी विचारांच्या उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून डॉ. दाभोलकर यांच्या वाटचालीबद्दल मार्मिक भाष्य करत मांडणी केली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला कार्यकर्ते अण्णा कडलसकर यांनी लिहिलेला डॉ. दाभोलकर यांच्या योगदानाला सलाम करणाऱ्या पोवाडा सादर झाला. अंनिस वार्तापत्रचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी सुत्रसंचलन आणि आभार सम्राट हटकर यांनी मानले. कार्यकर्ते फारुक गवंडी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यभरातून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ट्रस्टी उपस्थित होते.



