पर्यटनमुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

पर्यटकांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळे  गजबजली ! जास्त पसंती गणपतीपूळेला !!

रत्नागिरी : कोकणात दिवाळी सणाची धूम असताना रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पुन्हा पर्यटकांनी गजबजण्यास सुरुवात झाली आहे. या सुट्टीमध्ये देखील परजिल्ह्यातील पर्यटकांनी रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणाला जास्त पसंती दिल्याचे पहावयास मिळत आहे. गणपतीपुळे येथील हॉटेल, लॉज व खाजगी घरगुती निवासाची ठिकाणे हाऊस फुल्ल झाली आहेत.

राज्यात दिवाळी सणाच्या सुट्टीचा काल सुरु झाला आहे. रविवार दि. १९ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर अशा आठ दिवस सूटट्या असल्याने पर्यटकांनी कोकणातील पर्यटन स्थळांकडे मोर्चा वळवला आहे. परजिल्ह्यातील पर्यटकांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना पुन्हा पसंती दिल्याने जिल्ह्यातील पर्यटन ठिकाणे गजबजून लागली आहेत. रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील गणेश मंदिराला पर्यटकांनी जास्त पसंती दिल्याने गणपतीपुळे येथील मंदिर परिसर व बाजार पेठ परिसर पर्यटकांनी फुलून गेला आहे.

गणपतीपुळे येथील व्यावसायिक व मंदिर व्यवस्थापन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. यानिमित्ताने गणपतीपुळे येथील सर्वच लहान मोठे स्थानिक पर्यटन व्यवसायिक, एमटीडीसी व देवस्थान समितीने विविध सेवा सुविधांची तयारी पुर्ण केली असून पर्यटकांच्या सेवेसाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे.

राज्यातील शाळा व महाविद्यालय व शासकीय विभागाना रविवार पासूनच दीवाळी सणाची सुट्टी जाहीर झाल्यानंतर अनेक पर्यटकांची पावले आता गणपतीपुळेसह अन्य पर्यटन स्थळांकडे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी वळू लागली आहेत. गणपतीपुळे येथे शनिवारपासून पर्यटकांनी हजेरी लावल्याचे चित्र दिसून येत आहे.

गणपतीपुळे येथील महाराष्ट्र पर्यटन निवास महामंडळाच्या निवासस्थांनामध्ये आधीपासून आरक्षण बुकिंग झाल्याची माहिती गणपतीपुळे पर्यटन निवासाचे निवासी व्यवस्थापक यांनी दिली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी गणपतीपुळे एमटीडीसीलाही पसंती दर्शवली आहे. त्याचबरोबर गणपतीपुळे परिसरातील सर्व खासगी हॉटेल, लॉजिंग पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सेवा सुविधा मिळवून देण्यासाठी स्थानिक पर्यटन व्यावसायिक सज्ज झाले आहेत.

गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मोरया वॉटर स्पोर्ट्स संस्थेच्या माध्यमातून वॉटर स्पोर्ट्सच्या बनाना राईड, ड्रॅगन राईड, जेसकी बोट, डिस्को राईट आदी वॉटर स्पोर्ट्सच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याबरोबर फोटोग्राफी, एटीव्ही बाईक, उंट, घोडा सफर आदी प्रकारांचा आनंद पर्यटकांना गणपतीपुळे समुद्र किनारी घेता येणार आहे. गणपतीपुळे परिसरात पर्यटकांची वाढती संख्या पाहता येथील हॉटेल्स, लॉज व इतर व्यावसायिक लोकांची दिवाळी गोड होणार यात कोणतीत शंका नाही, असे चित्र दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button