युनेस्कोचे तज्ज्ञांचे पथक २ ऑक्टोबरला दापाेलीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याची पाहणी करणार

दापोली : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तालुक्यातील हर्णै सुवर्णदुर्ग किल्लाची जागतिक वारसा यादीत नोंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, या किल्ल्याची पाहणी करण्यासाठी २ ऑक्टोबर रोजी युनेस्कोचे तज्ज्ञांचे पथक दापाेलीत दाखल हाेणार आहे. युनेस्कोच्या मान्यतेनंतर सुवर्णदुर्ग किल्ला जागतिक पर्यटन क्षेत्रात जगाच्या नकाशावर झळकणार आहे.
अरबी समुद्रातील एका सुंदर बेटावर असलेला १६ व्या शतकातील सुवर्णदुर्ग किल्ला आहे. हा किल्ला स्थापत्यकलेचा एक अप्रतिम नमुना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक व सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला म्हणून हर्णै येथील सुवर्णदुर्ग किल्ला ओळखला जाताे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत या किल्ल्याचा समावेश हाेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसा प्रस्ताव शासनाकडून युनेस्काेला पाठविण्यात आला आहे. त्यासाठी २ ऑक्टोबर रोजी युनेस्काेचे एक पथक पाहणीसाठी दापाेलीत दाखल हाेणार आहे. हे पथक सुवर्णदुर्ग किल्ल्याची पाहणी करणार आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने किल्ल्याच्या डागडुजीसह इतर कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. येथील गोवा किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ला दरम्यान या निधीतून जेटी बांधण्यात येणार आहे.



