मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तराजकीयविधानसभा निवडणूक २०२४

नाराजी बाजूला सारत नातू दाम्पत्य रंगले प्रचारात 

गुहागर विधानसभा मतदारसंघ : महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचारासाठी सक्रीय

दापोली : भारतीय जनता पक्षाला रत्नागिरी जिल्ह्यात एकही मतदारसंघ सोडला नसल्याने नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉ. विनय नातू हे पक्षादेश आल्यानंतर नाराजी बाजूला ठेवत पत्नी डॉ. विनिता यांच्यासह महायुतीच्या उमेदवाराचा घरोघरी प्रचार करताना दिसत आहेत. एका मतदारसंघामुळे महायुतीत कुठेही कटूता येऊ नये या दृष्टिकोनातून डॉ. नातू यांनीच आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची समजूत काढत महायुतीचा विजयी करण्याचा संकल्प सोडला आहे.

पक्षनिष्ठा, आदेश या साऱ्या गोष्टी सद्यस्थितीतल्या राजकारणात सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा पदाधिकारी यांच्या पचनी पडताना दिसत नाहीत. परंतु केवळ पक्षादेश मानून हे डॉ. नातू दाम्पत्य आज गेली अनेक वर्षे कोकण पट्ट्यात आपल्या पक्षाचा अजेंडा घरोघरी पोहचवण्याचे काम करत आहेत. जनसंघापासूनच नातू कुटुंबातील सर्वच सदस्य पक्षादेश पाळत आले आहेत. मोठ्या संघर्षातून जनसंघाचे कोकणातील पहिले आमदार डॉ. तात्यासाहेब नातू ठरले. त्यानंतर मात्र डॉ. नातू यांचे वैद्यकीय सेवेतील वैशिष्ट्यपूर्ण योगदान आणि प्रत्येकाशी असलेला वैयक्तिक लळा यामुळे पुढे तब्बल २५ वर्षे आमदार म्हणून कौतुकास्पद कामगिरी केली. त्यानंतर त्यांचे सुपुत्र डॉ. विनय नातू यांनी २० वर्षे आमदार म्हणून उत्तम कामगिरी केली. गेली १५ वर्ष डॉ. नातू यांनी पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी निष्ठेने संभाळली आहे. त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी डॉ. सौ. विनीता नातू या देखील पक्ष संघटना बांधणीसाठी झटत आहेत.

सौ. नातू यांनी गुहागर, चिपळूण, संगमेश्वर या तालुक्यातून महिलांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण वर्ग, शिबीरे यांचे आयोजन करून महिला सबलीकरणासाठी विशेष पाऊल उचलले आहे. महिला पतसंस्था, किशोरवयीन मुलींकरता “हितगुज उमलत्या कळ्यांची” हा कार्यक्रम, बचत गटांना प्रशिक्षण, आर्थिक परिस्थिती कमी त्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे शिक्षण, उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत, मुलांचे वसतिगृह असे विविध उपक्रम सौ. नातू यांनी राबविले आहेत. त्यामुळे या कुटुंबाचे पक्ष बांधणीसाठी योगदान पाहून यावेळची विधानसभा आपल्याला लढवायची आहे. त्या अनुषंगाने तयारीला लागा, असा वरिष्ठांचा आदेश मिळताच डॉ. नातू यांच्या सह पत्नी सौ. विनिता देखील गुहागर मतदारसंघात सक्रिय झाल्या; परंतु महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिंदे शिवसेनेकडे गेला. त्यामुळे गेली १५ वर्षे या मतदारसंघात भाजपचे कमळ फुलेल या आशेवर असलेला भाजपाचा सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र कोलमडून गेला. त्यानंतर तळागाळातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गावागावात बैठका घेऊन भाजप श्रेष्ठींसह महायुतीच्या मुख्य नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन हा मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी मागणी केली. परंतु एका मतदारसंघामुळे महायुतीत कुठेही कटूता येऊ नये या दृष्टिकोनातून डॉ. नातू यांनीच आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची समजूत काढत महायुतीचा उमेदवार विजयी करण्याचा संकल्प सोडला. सद्यस्थितीत गुहागर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांचा गावागावात वाडी वस्तीवर जाऊन प्रचार करताना डॉ. नातू व त्यांच्या पत्नी डॉ. विनिता नातू दिसून येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button