मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

रत्नागिरीत गुढीपाडवा स्वागतयात्रा ९ एप्रिलला

सुमारे १३० चित्ररथांचा सहभाग : ७ एप्रिलला सायंकाळी दुचाकी फेरी

रत्नागिरी : हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त रत्नागिरीत ९ एप्रिलला ग्रामदेवता श्री देव भैरी मंदिर ते समाजमंदिर श्री पतितपावन मंदिर अशी स्वागतयात्रा काढण्यात येणार आहे. यात सुमारे १३० मंदिर संस्था, ज्ञाती संस्था, नवरात्रोत्सव मंडळांचे चित्ररथ सहभागी होणार असून, ढोल-ताशांचा गजर, भजनी पथके, लेझीम यांसह विविध चित्ररथ पाहायला यात मिळतील. ७ एप्रिलला सायंकाळी दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे. विसाव्या वर्षी काढण्यात येणाऱ्या या फेरीत हिंदू धर्मातील सर्व पंथातील आबालवृद्ध मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत सहभागी होतील.
स्वागत यात्रेचे नियोजन करण्यासाठी पतितपावन मंदिरात रविवारी (ता. १७) बैठक झाली. यात सुरूवातीला हिंदू समाजातील दिवंगत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर हिंदू गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. ९ एप्रिलला श्री भैरी मंदिरात गुढी उभी केल्यानंतर सकाळी ९ वाजता स्वागयात्रेला सुरवात होणार आहे. त्याच वेळी मारुती मंदिर येथून वरील भागातील रथांची स्वागतयात्रा निघणार आहे. त्यानंतर जयस्तंभ येथे दोन्ही यात्रांचे एकत्रीकरण होणार असून तिथून पुढे पतितपावन मंदिरात यात्रा पोहोचेल. झाडगाव येथील भैरी मंदिर येथून प्रारंभ झाल्यानंतर स्वागतयात्रा, कॉंग्रेसभवन, गोखले नाकामार्गे जयस्तंभ येथे येईल. येथे ही यात्रा आणि मारुती मंदिरपासून निघालेली स्वागतयात्रा एकत्र होऊन विराट संख्येने राम आळी मार्गे, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिरात पोहोचणार आहे. येथे हिंदु धर्माची शपथ घेऊन यात्रेची सांगता करण्यात येणार आहे. स्वागतयात्रेत रत्नागिरी शहरासह कुवारबाव, नाचणे, मिरजोळे, भाट्ये, फणसोप, मिऱ्या, शिरगाव, कर्ला, जुवे, आंबेशेत अशा जवळच्या गावांतील ग्रामस्थ सहभागी होणार आहेत.
डोंबिवली येथील पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीत २००५ मध्ये पहिली स्वागयात्रा सुरू झाली. हिंदुत्वाचा जयघोष करण्यासाठी ही यात्रा जल्लोषात निघाली व दिवसेंदिवस या यात्रेत गर्दीचे उच्चांक मोडले जात आहेत. यंदा अधिकाधिक ज्ञातीसंस्था, आबालवृद्धांनी आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. या बैठकीला श्री देव भैरी मंदिर देवस्थानचे उपाध्यक्ष राजन जोशी, पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेश शिंदे, विश्वस्त अॅड. बाबा परुळेकर, राजेश आयरे, संतोष पावरी, आनंद मराठे, उमेश खंडकर, कौस्तुभ सावंत, रवींद्र भोवड, गजानन करमरकर, राकेश नलावडे, संजय जोशी, जितेंद्र शिवगण, चंद्रकांत राऊळ, बावा नाचणकर, राजन फाळके, तनया शिवलकर, दीपक सुर्वे, नीला दात्ये, राकेश मयेकर, बी. टी. मोरे, कैलास विलणकर, रमेश सुर्वे, नीलेश शाह, दर्शन जाधव, ओंकार फडके यांच्यासमवेत शहरातील विविध देवस्थानांचे अध्यक्ष, पदाधिकारी, जैन समाजासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुढील बैठकीविषयी
तारीख : रविवार, ३१ मार्च २०२४
वेळ : सायंकाळी ५.३० वाजता
स्थळ : पतितपावन मंदिर, गाडीतळ, रत्नागिरी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button