कोकण हा शिवसेनेचा ऑक्सिजन, कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सर्वसामान्यांसाठी सोन्याचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न, रत्नागिरीत आभार यात्रा : ठाकरे शिवसेनेतील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा प्रवेश

रत्नागिरी : होती दाढी म्हणून उध्वस्त झाली महाविकास आघाडी आणि चालू झाली विकासाची गाडी असे म्हणत आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही पण विकासाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला सोन्याचे दिवस आणण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. कोकण हा निसर्गरम्य परिसर आहे. इथे स्वार्थी राजकारणाला वाव नाही. कोकणामुळे शिवसेना वाढली. त्यामुळे कोकण हा शिवसेनेचा ऑक्सिजन आहे. आमदार उदय सामंत, योगेश कदम, निलेश राणे यांच्या माध्यमातून कोकणचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत”, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांची आभार यात्रा महाराष्ट्रभर सुरू असून रत्नागिरीतील चंपक मैदान येथे आज (१५ फेब्रुवारी) त्यांची आभार सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार उदय सामंत, आमदार किरण सामंत, आमदार योगेश कदम, माजी मंत्री रामदास कदम, आमदार नीलेश राणे, ठाण्याचे रवींद्र फाटक, माजी आमदार राजन साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थिताना माझ्या लाडक्या बहिणींनो भावांनो आणि लाडक्या कोकणवासीयांनो, असे संबोधून उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, “नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत २३२ जागा मिळवून अद्भुत दैदिप्यमान विजय आपण मिळवला याचा आनंद आहे आणि त्यासाठीच नतमस्तक व्हायला मी आलो आहे. ठाकरे सेनेने ९७ जागा लढविल्या आणि त्यातील केवळ २० च जागा जिंकल्या आणि आपण फक्त ८० जागा लढविल्या आणि यांचा एकही आमदार निवडून येणार नाही अशा वल्गना करणाऱ्यांसमोर साठ आमदार निवडून आणले. महाराष्ट्राने त्यांची बोलती बंद केली. १५ लाख मते मिळाली. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची, बाळासाहेबांचे वारसदार कोण हे जनतेने ठरवले. आमचे आमदार निवडून आल्यानंतर ईव्हीएम घोटाळा, मतदार यादी मध्ये घोळ असे अनेक आरोप झाले मात्र तमाम लाडक्या भगिनींनी हे भगवे वादळ महाराष्ट्रात आणले. गेल्या अडीच वर्षात पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पादाक्रांत केला आणि बंद पडलेल्या महाराष्ट्राला, अनेक विकासकामे रद्द केलेल्या महाराष्ट्राला विकासाच्या रूपाने चालना दिली. सर्वांसाठी विविध योजना आणल्या खऱ्या अर्थाने विकास काय असतो हे विकासाच्या माध्यमातून दाखवून दिले.”
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, “सीएम होतो तेव्हा स्वतःला कॉमन मॅन म्हणजे सर्वसामान्य माणूस म्हणवत होतो आणि आता मी डीसीएम आहे म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणजे सर्वसामान्यांसाठी वाहून घेतलेला माणूस. बाळासाहेब नेहमी म्हणायचे पद, सत्ता येते जाते; पण एकदा नाव गेले की पुन्हा येत नाही. करोडोंचा लाडका भाऊ ही नवी ओळख मला मिळाली, ही ओळख मला सर्व पदांपेक्षा सर्वोच्च आहे. पक्ष मोठा करायचा असेल तर कार्यकर्त्यांना बळ द्या हे माझे नेहमीच सांगणे पण कुणीही नेता मोठा होऊ नये म्हणून कसे खच्चीकरण केले जाते याचा अनुभव रामदास कदम यांनी घेतला आहे. ‘राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा’ असा आपला पक्ष आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत डावोसला जाऊन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी १६ लाख कोटींचे करार केले, याचा मला अभिमान आहे. त्यातील ८५ टक्के करारांची अंमलबजावणी झाली आहे.
आम्हाला हलक्यात घेऊ नका, असा इशारा देताना श्री. शिंदे म्हणाले, “अजून किती शिव्या शाप देणार, अजून किती आरोप आमच्यावर करणार. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवले, पण मुख्यमंत्रीपदासाठी ह्यांनी ती काँग्रेसच्या दावणीला नेऊन बांधली. ती एकनाथने सोडवून आणली. कशाला माझ्या नादाला लागता मी माझ्या कामातूनच बोलणार. केवळ मंत्रालयात बसून निर्णय होत नाहीत त्यासाठी बांधावर जावे लागते, सर्वसामान्य लोकांमध्ये जावे लागते, शेतकऱ्यांशी संवाद साधावा लागतो, त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवाव्या लागतात अन् हेच काम आम्ही गेली अडीच वर्ष करत आहोत.
कोकणाविषयी बोलताना ते म्हणाले, “शिवसेना वाढविण्यात कोकणचा मोठा वाटा आहे. त्यामुळे कोकणासाठी जेवढे करता येईल तेवढे करू. ६७ टीसीएम पाणी कोकणात थांबले पाहिजे यासाठी काम सुरू झालं असून या भागात छोटे छोटे पाण्याचे बंधारे, धरणे बांधली जातील. त्यासाठी कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून यामध्ये एमआयडीसी आणि सिडको यांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे समृद्धी महामार्ग केला आहे त्याच धर्तीवर मुंबई ते सिंधुदुर्ग ॲक्सिस कंट्रोल एक्सप्रेस हायवे प्रस्तावित आहे. त्यामुळे मुंबईतील माणूस थेट गोव्याशी जोडला जाईल आणि या माध्यमातून विकासाची दारे उघडी होतील. वाटद एमआयडीसीच्या माध्यमातून तीस हजार कोटींच्या दोन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. यातून हजारोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार असून कोकणातला तरुण इथेच राहील.”
“आपल्या कार्यकर्त्यांवर, लोकप्रतिनिधींवर अविश्वास दाखवला जातो. कुणाची लाईन कापून कुणालाही मोठा होता येत नाही. त्यामुळे माझी लाईन कापण्याचा प्रयत्न करू नका त्या बाजूला जनसेवेची स्वतःची दुसरी मोठी लाईन उभी करा. जिथे विचारांना वाळवी लागली आहे तिथे साळवी तरी कसे टिकतील. आज हे लोक का तुम्हाला सोडतात याचे आत्मचिंतन करा, असा सल्ला श्री. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता दिला.

तत्पूर्वी बोलताना रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवला. ते म्हणाले, “आजची ही भगवी लाट पाहून आनंद झाला, बाळासाहेबांची आठवण झाली आणि आजही कोकण हा शिवसेनेचा अभेद्य किल्ला आहे हेच यातून दिसून आले. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना काळीमा फासण्याचे त्यांचे विचार पायदळी तुडवण्याचे पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. उद्धवजी तुम्हाला लाज वाटली पाहिजे. बाळासाहेबांचे नाव घेताना आजपर्यंत कमावलेले मुख्यमंत्रीपद घेऊन गमावले. कोकणी माणसाने शिवसेनेला मोठी केली. उदय सामंत यांच्यावर आजतागायत कधीही टीका केली नाही कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे एक दिवस ते भगवा धरणार हा विश्वास होता. उदय सामंत कुठेही विकासाला कमी पडत नाही. ५० वर्षे आम्ही मातोश्री काढली आहेत. त्यामुळे आम्हाला तोंड उघडायला लावू नका. ज्या दिवशी आम्ही तोंड उघडून त्या दिवशी आदित्य आणि उद्धव ठाकरेंना देश सोडून पळावे लागेल. आम्हीही मातोश्रीवर विकासासाठी खोके दिले आहेत.”

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, “उद्योग क्षेत्रात क्रांती करण्याची भूमिका शिंदे साहेबांनी घेतली. निवडणुकीत आमच्याबद्दल वेगवेगळे प्रचार अपप्रचार होत होते पण जनता आम्हाला नक्की स्वीकारेल यावर आम्ही ठाम होतो. एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्राला दिशा देणारे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी उल्लेख केला. त्याचेही पोटशूळ उठले. आजचा पक्षप्रवेश हा दुसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात राजन साळवी आले, दुसऱ्या टप्प्यात आज पक्ष प्रवेश केलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आले आणि आता तिसरा टप्पा राहिला असून येत्या महिन्याभरात लवकरच आणखीन उबाठाचे पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करतील. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय घेतला तो योग्यच होता. ही योजना बंद होणार नाही.”


दरम्यान, आज ठाकरे शिवसेनेतून हकालपट्टी केलेले माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, विलास चाळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, सौ. रचना महाडिक, माजी आमदार सुभाष बने यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.



