मुख्य बातमी

गुहागर पोलीस ठाण्यातर्फे नवरात्र उत्सव मंडळांची बैठक

गुहागर : गुरुवारपासून (३ ऑक्टोबर) शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर गुहागर पोलीस ठाण्यातर्फे शृंगारतळी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये तालुक्यातील ३५ नवरात्र उत्सव मंडळांची बैठक घेण्यात आली. यात कायद्याचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

याबाबत मार्गदर्शन करताना पोलीस विभागीय अधिकारी श्री. राजमाने यांनी शासनाने दिलेल्या नियम व अटी यांचे पालन करा, असे सांगतानाच उत्सवाला कोठेही गालबोट लागू न देता देवीवर असलेले सोन्याचे दागिने सुरक्षित कसे राहतील यासाठी सर्व नागरिकांनी जागरुक राहण्याचे तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले. विसर्जनावेळी छोट्या हातगाड्यांचा वापर कर, असेही त्यांनी यावेळी सांगिले.

तालुक्याच्या नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष उमेश शिंदे यांनी कोणत्याही मंडळाकडून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी आम्ही घेऊ; मात्र दिलेल्या वेळेपेक्षा काही वेळ जास्त झाल्यास त्वरित कारवाई करू नका आम्ही त्या मंडळास समज देवू असे सांगितले. सर्वांनी शासनाने दिलेल्या सूचनेचे पालन करावे व पोलीस प्रशासनाला योग्य प्रकारे सहकार्य करावे, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले.

यावेळी विभागीय अधिकारी श्री. राजमाने, गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत, वैभव चौगुले, उपसरपंच आसिम साल्हे, बापू कोळवणकर, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश चव्हाण, विश्वास बेलवलकर, पोलीस पाटील विशाल बेलवलकर, प्रसाद कुष्टे, प्रवीण पटेल, महादेव वढे,मोहन तांबे, आरेकर यांसह तालुक्यातील प्रत्येक मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button