आर्टिकलसाहित्य-कला

कोकणाची साहित्यिक वाटचाल

कोकणाची साहित्यिक वाटचाल

२१ ते २३ फेब्रुवारी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणातील साहित्यिक वाटचाल यावर विशेष लेख..

‘सह्याद्रीच्या कुशीत वसले हिरवे तळकोकण’ असं वर्णन केलेली कोंकणभूमी केवळ निसरसौन्दर्यानेच नटलेली नाही, तर बौद्धिक सुंदरता हेदेखील तिचं एक भूषण आहे. ही बौद्धिक सुंदरता वेळोवेळी अनेकांच्या लेखणीतून प्रकट झाली आहे. नवी दिल्लीत होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कोंकणाच्या साहित्यिक वाटचालीचा ओझरता आढावा घेण्याचा हा प्रयत्न….

कोंकणाच्या वाड्मयीन प्रवासाचा आरंभ जवळजवळ एक हजारांहून अधिक काळ मागे जातो. ‘उदयसुंदरी’ हे संस्कृत काव्य लिहिणारा सोढ्ढल हा या तांबड्या मातीचा पहिला साहित्यिक सुपुत्र. शिलाहारकालीन कोंकणात याज्ञवल्क्य स्मृतीवरील ‘अपरार्कटीका’, ‘शब्दार्णवचंद्रिका’ असे प्रौढत्वाने लिहिलेले ग्रंथ निर्माण झाले. मात्र दुर्गम कोंकणात प्राचीन काळी ग्रंथनिर्मिती कमी झाली तरी ज्ञानार्जन करण्याची परंपरा निर्माण झाली ती आजतागायत टिकून राहिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर कविता रचणारे परमानंद आणि शिवछत्रपतींचं पहिलं मराठी गद्य चरित्र लिहिणारे गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर हे दोघे कोंकणातलेच. जुन्या कालबाह्य रुढी सोडून द्यायला पाहिजेत असा संदेश देत नवकवितेची ‘तुतारी’ फुंकणारे कृष्णाजी केशव दामले अर्थात केशवसुत हेदेखील याच कोंकणमातीचे सुपुत्र; ‘हिंदू धर्मशास्त्रा’चा इतिहास लिहिणारे भारतरत्न महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणेही याच भूमीतले; आणि मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांतून सहजपणे लिहिलेल्या ज्यांच्या चारित्रांबद्दल लोकसभेचे पहिले सभापती दादासाहेब मावळंकर यांनी ‘आधुनिक चरित्र लेखनाचा पायंडा’ असा गौरव केला ते पद्मभूषण डॉ. धनंजय कीर हे सुद्धा रत्नागिरीचंच एक रत्न!

अर्थात एखाद्या प्रदेशाच्या साहित्यिक वाटचालीचा आढावा म्हणजे केवळ कवी लेखकांची जंत्री करणे नव्हे. ब्रिटिश सरकारच्या काळात या भूमीला आधुनिक शिक्षणाची ओळख झाली. मुंबईबाहेरच्या महाराष्ट्रातील पहिलं सार्वजनिक ग्रंथालय रत्नागिरी शहरात १८२८ साली स्थापन झालं. पाठोपाठ अनेक शाळा सुरू झाल्या. इथल्या मुळात बुद्धिमान असणाऱ्या लोकांनी या गोष्टींचा लाभ घेतला नसता तरच नवल!

माणसं शिकली की लिहू शकतात. कोंकणातील लोकांची पोटापाण्यासाठी मुंबईस जाण्याची परंपरा, या ओघात नवशिक्षित बुद्धिमंतही असत. गंमत अशी की एसटी, बेस्ट यांसारख्या प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या सार्वजनिक उपक्रमांत नोकऱ्या करणाऱ्या या भूमीतील अनेकांनी हातात लेखणी धरून उत्कृष्ट वाड्मय निर्माण केलं. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, श्री. ना. पेंडसे आणि अलीकडच्या काळातील कवी अशोक लोटणकर ही याची उदाहरणं.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना सरकारने रत्नागिरीत स्थानबद्धतेत ठेवलं असताना अनेक पुस्तकं लिहिली. सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचं दर्शन घडवत जनजागृती करणारी त्यांची ‘संन्यस्त खड्ग’ वगैरे नाटकं इथेच लिहिली गेली. त्याच काळात इतिहासाचार्य राजवाडे, ‘रियासतकार’ सरदेसाई, वासुदेवशास्त्री खरे इत्यादी इतिहासकार होऊन गेले, पुढे अण्णा शिरगावकर, डॉ. दाऊद दळवी यांनी त्यांची संशोधन व लेखनाची परंपरा चालविली.

साठोत्तरी काळातील वंचितांच्या साहित्याच्या निर्मितीत कोंकण मागे राहिला नाही. ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ हे माधव कोंडविलकर यांचं पुस्तक याचंच उदाहरण.

१९९० मध्ये रत्नागिरीस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, कोंकणातील साहित्यिकांचा प्रादेशिक विचारमंच म्हणता येईल अशा ‘कोंकण मराठी साहित्य परिषदे’ची स्थापना ही यातील चर्चेची फलश्रुती. २०१३ मध्ये चिपळूणला झालेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’त साहित्याच्या समाजाभिमुखतेवर व्यापक चर्चा झाली.

या भूमीने मराठीला वि. स. खांडेकर आणि विंदा करंदीकर यांच्यासारखी ‘ज्ञानपीठं’ दिली. महाराष्ट्र शासनाने मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला चरित्रकार धनंजय कीर आणि रामटेकच्या कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला महामहोपाध्याय पां. वा. काणे यांची नावं देऊन या भूमीतील साहित्य आणि साहित्यनिर्माते या दोहोंचाही गौरव केला आहे.

राजेंद्रप्रसाद स. मसुरकर,रत्नागिरी 9960245601 *shree.masurkar@gmail.com*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button