मुख्य बातमी

ग्रामपंचायतीमध्ये आता नल जल मित्र 

जलजीवन मिशन अंतर्गत राज्यातील पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती : जिल्ह्यातील प्रति ग्रामपंचायत ३ उमेदवारांची निवड

रत्नागिरी : जलजीवन मिशन अंतर्गत राज्यातील पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी-प्लंबर, मेकॅनिक, फिटर व इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर याप्रमाणे ३ नल जल मित्र यांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी आपापल्या ग्रामपंचायतींशी संपर्क साधण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती योग्य रीतीने व्हावी, या उद्देशाने प्रति ग्रामपंचायत ३ नल जल मित्र यांची निवड करण्यात येणार आहे. वरील तिन्ही पदांसाठी प्रत्येक पदासाठी तीन याप्रमाणे प्रति ग्राम पंचायत ९ उमेदवारांची नामनिर्देशने राज्यस्तरावर करण्यासाठी ग्रामपंचायतीने घेऊन त्यांची माहिती ॲपवर भरायची आहे. ग्रामपंचायतीने सादर केलेल्या नामनिर्देशनामधून राज्यस्तरावरून उमेदवारांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

यासाठी निश्चित करण्यात आलेल्या कौशल्य संच असे आहेत. प्लंबर/गवंडी, मोटर मेकनिक/फिटर, आणि इलेक्ट्रिशियन/पंप ऑपरेटर या तीन ट्रेडसाठी गावातील अनुभव असलेल्या व उचित पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे. म्हणजेच हे कौशल्य असलेल्या उमेदवारास गावातच रोजगार उपलब्ध होणार आहे.

ग्रामपंचायत अधिकारी यांनी उमेदवारांचे अर्ज प्राप्त करून घेऊन गुणवत्ता यादीनुसार अनुक्रमे विहित नमुन्यातील पत्राद्वारे तयार करून त्याचे आयडेंटी साईज फोटो,आधार कार्ड आणि शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्र संबंधित पंचायत समिती येथे सादर करावयाची आहे. त्यानंतर त्यांची प्रि-स्क्रिनिंग टेस्ट राज्यस्तरावरून करण्यात येणार आहे. यामधून प्रति ग्रामपंचायत कौशल्य संचसाठी एक ट्रेडसाठी एक उमेदवार प्रमाणे एका ग्रामपंचायतीकडून ९ नामनिर्देशित अनुभवधारक उमेदवार अर्ज करतील व त्यातून प्रशिक्षणासाठी अंतिम ३ पात्र ठरतील.

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना कार्यान्वित घरगुती नळ जोडणीद्वारे प्रती माणसी प्रती दिन ५५ लीटर विहित गुणवत्तेसह स्वरूपात कार्यान्वित नळाद्वारे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे.

या योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी व योजना शाश्वत टिकविण्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता असणे आवश्यक आहे. यासाठी लोकसहभागाला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. पाणी पुरवठा योजनेच्या पूर्व नियोजन टप्प्यापासून ते देखभाल दुरुस्ती टप्प्यापर्यंत योजनेच्या भागधारकांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय योजना टिकू शकत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button