मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचा उद्या लोकार्पण सोहळा…!

जिजाऊ संस्थेचे मोफत चालविले जाणारे हे महाराष्ट्रातील तिसरे रुग्णालय रत्नागिरीत. 

रत्नागिरी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संचालित श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय प्रशस्त व सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानासहित तसेच तज्ञ डॉक्टर व आवश्यक असा प्रशिक्षित पॅरामेडिकल स्टाफसह जनतेच्या सेवेला वाहून घेण्यासाठी सज्ज आहे, उद्या १ जून श्री. निलेश सांबरे साहेबांच्या वडिलांचा म्हणजे श्री. भगवान महादेव सांबरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातील तसेच गरजू रुग्णाच्या आरोग्य सेवेसाठी हे रुग्णालय सुरू करण्यात येत आहे.

जनरल सर्जरी, हृदयरोग विभाग, कॅन्सर विभाग, लॅब व डायग्नोसिस्ट सुविधा, बालरोग विभाग, यूरोलॉजी विभाग, स्त्रीरोग विभाग, नेत्ररोग विभाग, एडी मेडिसिन विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, न्यूरो विभाग आणि अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या मेडिकलमध्ये गोळ्या औषधे देखील मोफत मिळणार आहेत. जिजाऊ संस्थेमार्फत खाजगी तत्त्वावर मात्र मोफत चालविले जाणारे हे महाराष्ट्रातील तिसरे रुग्णालय आहे. 

जिजाऊ संस्थेमार्फत पहिले रुग्णालय झडपोली ता. विक्रमगड, जि. पालघर म्हणजे श्री. निलेश सांबरे यांच्या मूळ गावी १३० खाटांचे अद्यावत व सुसज्ज असे रुग्णालय २०१४ पासून कार्यरत आहे. यानंतर सहा महिन्यापूर्वीच शहापुर, जि. ठाणे येथे देखील असेच अद्यावत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ठाणे ग्रामीणच्या जनतेसाठी सुरू करण्यात आले आहे. पालघर व ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण २८ आरोग्य क्लिनिक आहेत.आरोग्य व शिक्षण या सामान्य माणसाच्या मूलभूत गरजा आहेत माणसाला चांगल्या आरोग्य सुविधा व गुणवत्ता पूर्ण शिक्षण हे मिळालेच पाहिजे यासाठी फक्त शासनावर अवलंबून राहून चालणार नाही तर आपली देखील सामाजिक जबाबदारी म्हणून आपण कमावलेल्या पैशातून हे प्रकल्प चालवले जावे व कुणीही व्यक्ती पैशाअभावी योग्य वैद्यकीय उपचारापासून वंचित राहणार नाही

जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे यांनी कोणत्याही सांविधानिक पदावर नसताना किंवा रत्नागिरी जिल्ह्याचे साधे रहिवासी देखील नसताना फक्त सामाजिक जाणिवेतून या संवेदनशील व्यक्तित्वाने आपली सामाजिक जबाबदारी म्हणून रत्नागिरीवासियांना दिलेले आश्वासन अगदी कमी काळात पूर्णत्वास आणले. श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयामुळे रत्नागिरीच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती होणार असून सर्वसामान्य रूग्णापासून अनेकांना या रूग्णालयाचा मोठा फायदा होणार आहे.

उद्या १ जून रोजी होणाऱ्या या भव्य लोकार्पण सोहळ्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिजाऊ संस्थेचे जिल्हाध्यक्ष ऍड. महेंद्र मांडवकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button