मुख्य बातमी

राजापूर तालुका व्यापारी संघाचा काळ्या फिती लावून निषेध

बदलापूर घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी

राजापूर : बदलापूर येथील घटनेचा निषेध म्हणून राजापूर तालुका व्यापारी संघाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राजापूर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी शनिवारी (२४ ऑगस्ट) काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला आहे. या घटनेसह देशात घडणाऱ्या महिला अत्याचारातील घटनांतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी व्यापारी संघाने राजापूर तहसीलदार व पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांना निवेदन दिले आहे.

बदलापूरसह महाराष्ट्र राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या सर्व घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या असुन त्या सर्व घटनांचा आम्ही व्यापारी जाहीर निषेध करत आहोत. या सर्व घटनांमधील सर्व आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोरात कठोर शासन करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे राजापूर तालुका व्यापारी संघाने केली आहे.

महाविकास आघाडीने बदलापूरच्या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या बंदमध्ये सहभागी न होता आपला व्यापार सुरू ठेवत काळ्या फिती लावून दुकाने उघडण्याचे आवाहन राजापूर तालुका व्यापारी संघाने केले होते; मात्र उच्च न्यायालयाने याचिकेवर दिलेल्या निर्णयानंतर हा बंद मागे घेण्यात आला आहे; मात्र व्यापारी संघाने आज राजापूर बाजारपेठेत बदलापूर घटनेचा निषेध आपल्या दुकानातील कामगारांसह काळ्या फिती लावून केला आहे. तसेच यातील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे राजापूर तहसीलदार व राजापूर पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. यावेळी राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, खजिनदार दीनानाथ कोळवणकर, प्रकाश कातकर, विनोद पवार, विनय गादीकर, माजी नगरसेवक अभय मेळेकर, राजापूर अर्बन बॅंकेचे उपाध्यक्ष विवेक गादीकर, संदेश टिळेकर, गणेश नार्वेकर आदी व्यापारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button