देश-विदेशमुख्य बातमी

आयएनएसव्ही कौंडिण्य’  नौकेद्वारे प्राचीन वारशाचे पुनरुत्थान करण्याचा प्रयत्न !

पोरबंदर, नवी दिल्ली : प्राचीन जहाजबांधणी शास्त्रानुसार तयार करण्यात आलेली ‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ या नौकेने पहिल्यावहिल्या लांब अंतराच्या प्रवासास सोमवारी सुरुवात केली. ही नौका गुजरातमधील पोरबंदर येथून मस्कत येथे जाण्यास सोमवारी निघाली. कारवार तळावर २१ मे रोजी ‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ नौदलात दाखल झाली.

‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ ही नौका म्हणजे भारताच्या प्राचीन सागरी वारशाचे प्रतीक आहे. हा वारसा जपणे, त्याचे पुनरुत्थान करण्याचा प्रयत्न या नौकेच्या बांधणीद्वारे करण्यात आला. नौदलाच्या पश्चिम कमांडचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांच्या हस्ते नौका औपचारिकपणे दौऱ्यावर रवाना झाली. ओमानचे राजदूत इस्सा सालेह अल शिबानी या वेळी उपस्थित होते.

प्राचीन नौकांच्या चित्रणावरून या नौकेची पूर्ण रचना करण्यात आली आहे. दोरीने फळ्या शिवण्याच्या (स्टिच-प्लँक) पारंपरिक तंत्राद्वारे नौकेची बांधणी करण्यात आली. एकही स्क्रू आणि नौकेचा पोलादी पाया याला घेण्यात आलेला नाही. इतिहास, प्राचीन काळातील कारागिरी आणि आधुनिक काळातील नौदलाची तज्ज्ञचा यांचा संगम असल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले. नौदलातील अधिकाऱ्याने सांगितले, की नौकाबांधणीची कुठलीही ब्लू-प्रिंट किंवा अवशेष उपलब्ध नव्हते. द्विमितिय चित्राचा आधार घेऊन त्रिमितिय स्वरुपाची रचना केली गेली. विविध आंतरशाखीय तज्ज्ञ यासाठी लागले. त्यात पुरातत्त्वशास्त्रज्ञ, नौदल रचनाकार, पाण्यातील नौकेच्या प्रवासाची शास्त्रोक्त चाचणी करणारे तज्ज्ञ आणि कारागिरांचा त्यात समावेश होता.

नौकेची लांबी ६५ फूट लांब असून, त्यावर १८ जण प्रवास करू शकतात. ही नौका पंधरा दिवस १४०० किलोमीटरचा प्रवास करून ओमानला पोहोचेल. भारताचा पश्चिम किनारा आणि ओमान यांना जोडणारा प्राचीन सागरी मार्गाचा मागोवा घेईल. या मार्गामुळे हिंदी महासागर क्षेत्रात व्यापार, सांस्कृतिक आदानप्रदानाला चालना मिळाली होती. भारत आणि ओमानमधील संबंध याद्वारे आणखी दृढ होतील.

ही नौका अजिंठा येथील प्राचीन लेणीमधील भित्तीचित्रावर आधारित आहे. अशा प्रकारची नौका पाचव्या शतकामध्ये वापरात होती. प्राचीन काळात उत्कृष्ट नौकानयनपटू कौंडिण्य यांनी आग्नेय आशियात मोठा प्रवास केला होता. सागरी शक्ती असलेला देश म्हणून भारताचा लौकिक होता.

काथ्या, नारळाच्या शेंड्यांचा वापर

पाचव्या शतकातील या नौकेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तांत्रिक पातळीवर मोठे आव्हान होते. अशा प्रकारची नौकाबांधणीचे कौशल्य असणाऱ्या केरळमधील कारागिरांना त्यासाठी खास पाचारण करण्यात आले होते. बाबू शंकरन यांच्या नेतृत्वाखाली नौकेची बांधणी झाली. काथ्या, नारळाच्या शेंड्या आणि जलरोधकासाठी नैसर्गिक राळ यांचा वापर करून लाकडाच्या फळ्यांची बांधणी करण्यात आली.

आयएनएसव्ही कौंडिण्य’ पोरबंदरवरून मस्कट येथे जाण्यास निघाल्याचे पाहून खूप आनंद झाला. भारताची समृद्ध सागरी परंपरा नौका दाखवते. या नौकेची बांधणी करणाऱ्या रचनाकारांचे, कारागिरांचे आणि भारताच्या नौदलाचे मी अभिनंदन करतो. नौकेवरील क्रू सदस्य प्रवासामध्ये आखाती देश आणि त्यापलीकडील भारताचे प्राचीन दुवे शोधणार आहेत, त्यांच्या प्रवासासाठी माझ्या शुभेच्छा. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button