मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

घेरा यशवंतगडाच्या दुरुस्तीच्या कामाची चौकशी करा आणि ठेकेदाराचा ठेका रद्द करावा, माजी विधान परिषद आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाने मागणी

घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन..

रत्नागरी :-राजापूर तालुक्यातील साखरी नाटे, नाटे परिसरातील ऐतिहासिक घेरा यशवंतगडाच्या दुरुस्तीच्या कामाची चौकशी करावी आणि सदरच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने ठेकेदाराचा ठेका तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी राजापूरच्या काँग्रेस नेत्या व माजी विधान परिषदेचे आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. यावेळी साखरी नाटे आणि नाटे परिसरातील बहुसंख्य शिवप्रेमी, ग्रामस्थ उपस्थित होते.

घेरा यशवंतगडाच्या दुरुस्तीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे सदर किल्ला हा सद्यस्थितीमध्ये दुरुस्तीच्या कामामुळे पर्यटकांसाठी धोक्याचा ठरत आहे. त्या ठिकाणी कुठच्याही प्रकारची ठेकेदाराकडून सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली नाही. कुठच्याही प्रकारचे सूचना फलक देखील लावण्यात आलेले नाही. त्यामुळे दुरुस्त केलेला नवीन किल्ल्याचा भाग एखादा जर कोसळला तर त्या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते. किल्ल्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी चिरेबंदी बांधकामाला चुना आणि वाळू लावण्यात आला आहे ती अक्षरशः हातामध्ये येत आहे. चांगल्या प्रकारचे बांधकाम करण्यात आलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपण किल्ल्याच्या ठिकाणी येऊन तात्काळ पाहणी करावी व अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी काँग्रेसच्या नेत्या व माजी विधान परिषदेचे आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी घेरा यशवंतगडाच्या पडझड झालेल्या घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे आश्वासन दिले. या भेटी वेळी प्रामुख्याने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी साखरी नाटे आणि नाटे ग्रामपंचायतीच्या वतीने देखील किल्ल्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या संदर्भात निषेध व्यक्त करत निवेदन सादर केले.

यावेळी राजापूरचे माजी लोक नियुक्त नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे, नाटेचे सरपंच संदीप बांदकर, देवेंद्र बांदकर, निलेश बांदकर, मलिक गडकरी, नौशाद धालवेलकर, मजीद सायेकर, सुरेश बांदकर, आदी ग्रामस्थ, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button