‘टायनी टॉट्स’च्या कला बहार स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी : कागदावर रेखाटलेल्या चित्रांना कल्पनाशक्तीच्या कुंचल्यातून वेगवेगळ्या रंगांचे फटकारे मारत चिमुकले हात रंगांनी शब्दशः न्हाऊन निघाले आणि रंगाच्या सान्निध्यात रममाण झाले. निमित्त होते ते येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या ‘टायनी टॉट्स’ या पूर्व प्राथमिक विभागातर्फे आज (ता. १३) घेण्यात आलेल्या ‘कला बहार’ या रंगभरण आणि फिंगर प्रिंटिंग स्पर्धेचे.
या स्पर्धेत शहरातील विविध शाळांतील १०० हून अधिक मुले सहभागी झाली होती. वय ३ ते ४ वर्षे आणि वय ५ ते ६ वर्षे या दोन वयोगटात ही स्पर्धा झाली. यात ग्रुप ‘ए’मध्ये (वर ३ ते ४ वर्षे) प्राहिल कांबळे (टायनी टॉट्स प्री प्रायमरी सेक्सन नवनिर्माण हायस्कूल), रूद्र कीर (जीजीपीएस), रुत्वी सावंत (फाटक हायस्कूल) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. आमीरआली लांबे (सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल) याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. ग्रुप ‘बी’मध्ये (वय ५ ते ६ वर्षे) झिदान लांबे (सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल), व्रिशांक चाळके (ल. ग. पटवर्धन शाळा), सौमित्र आगाशे (जीजीपीएस) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. उत्तेजनार्थ पारितोषिक अभंगा पालांडे (टायनी टॉट्स) हिला देण्यात आले. थम्ब प्रिंटिंगमध्ये (वय ५ ते ६ वर्षे) रूद्र कीर (जीजीपीएस), व्रिशांक चाळके (ल. ग. पटवर्धन शाळा) आणि परी खानविलकर यांनी (टायनी टॉट्स) हे प्रथम तीन क्रमांक विजेते ठरले. उत्तेजनार्थ पारितोषिक सान्वी गायकवाड (टायनी टॉट्स) हिला देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण कलाशिक्षक निखील कांबळे यांनी केले.
या नंतर लगेचच स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा झाला. या वेळी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, ‘टायनी टॉट्स’ विभागाच्या प्रमुख सौ. मनूश्री राणे, परीक्षक निखील कांबळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. लुब्ना दवे यांनी केले.
या प्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष श्री. हेगशेट्ये यांनी मुलांच्या अंगभूत गुणांना वाव देण्यासाठी नवनिर्माण शिक्षण संस्था नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगितले. मुलांना करियर घडविण्यासाठी केवळ वैद्यकीय, अभियांत्रिकी एवढेच क्षेत्र नसून कला क्षेत्र हाही चांगला पर्याय असून, आजची स्पर्धा ही लहान मुलांमध्ये दडलेला चित्रकार शोधण्याचा केलेला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. मुलांची आवड लहान वयातच समजली तर पालकांनी त्या दृष्टीने नियोजन करणे सोपे जात असल्याचे सांगून सर्व सहभागी मुलांचे त्यांनी कौतुक केले.




