मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

मिऱ्या-नागपूर महामार्गामुळे आंबाघाटातून यंदाही प्रवास ठरणार धोकादायक!

दरड कोसळण्याची भीती, पर्यायी मार्ग आहे ?

साखरपा : मिऱ्या-नागपूर महामार्गामुळे आंबाघाट हा वाहतुकीस यंदाही अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. ठिकठिकाणी साचलेला चिखल, खड्ड्यांमुळे चाळण झालेला रस्ता आणि खोदकामामुळे दरड कोसळण्याची भीती यामुळे महामार्गावरून प्रवास हा धोकादायक ठरणार आहे.

मिऱ्या-नागपूर महामार्गाचे मुर्शी ते आंबाघाट रस्ता सुमारे २० किलोमीटरचा आहे. तीन वर्षांपूर्वीच अतिवृष्टीमुळे हा घाट काही ठिकाणी खचण्याचे प्रकार झाले होते. त्यावेळी हा घाट सुमारे २० दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. त्या वेळी धोकादायक ठिकाणाची डागडुजी करून हा घाट सुधारण्यात आला होता; पण आता मिर्‍या -नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे हा घाट पुन्हा धोकादायक झाला आहे.

महामार्गाचे मुर्शी ते कळकदरा आणि त्यापुढील थोडा भाग येथील काम सध्या सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यालागत खोदकाम सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वरून मोठमोठे दगड सुटून खाली आले आहेत. हे दगड सध्यातरी महामार्गावर आले नसले तरी मोठा पाऊस झाल्यास दरड कोसळून रस्त्यावर येण्याची शक्यता दाट आहे.

गेले तीन दिवस माॅन्सूनपूर्व पाऊस घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर पडत आहे. त्यातच घाटातील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. अद्याप माॅन्सून सुरूही झालेला नाही आणि रस्त्याची ही अवस्था झाली असेल तर ऐन पावसाळ्यात काय होईल? हा धोका आहे. डोंगरातून सुटून आलेले दगड वाहनांवर येऊ नयेत म्हणून घाटात पत्र्याचा आडोसा तयार केला आहे; पण हा आडोसा घाटात अवघ्या दोन ठिकाणीच केला असल्यामुळे तेथील प्रवास सुरक्षित झाला असला तरी घाटात अन्य ठिकाणी प्रवास करताना धोका कायम आहे.

मुर्शी पोलिस दूरक्षेत्र ते कळकदरादरम्यान बहुतांश भागातील किमान एका बाजूचा महामार्ग बांधून तयार झाला असला तरी तो सलग झालेला नाही. दोनशे ते तीनशे मीटर लांबीचा महामार्ग पार केल्यावर प्रत्येकवेळी किमान पन्नास फुटांचा पॅच हा कच्चाच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांना सलग प्रवास करता येत नाही. तीन वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी रस्ता खचला होता त्या ठिकाणी खालपासून बांधकाम करून त्याची डागडुजी करण्यात आली होती; पण आता त्या ठिकाणी रस्ता पुन्हा काहीसा खाली गेल्याचे वाहने चालवताना जाणवत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी अतिवृष्टी होऊन पुन्हा खालून माती वाहून गेल्यास हा रस्ता पुन्हा खचू शकतो.

* सुमारे २० किलोमीटरचा रस्ता धोकादायक

* माॅन्सूनपूर्व पावसाने दाणादाण

* मातीच्या ढिगाऱ्यांमुळे चिखल आणि खड्यांचे साम्राज्य

* आधी खचलेला भागही धोकादायक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button