जयगड येथे आक्रमक पालकांचा रस्ता रोक
पोलीस ठाण्यावर दिली धडक; वायुगळतीप्रकरणी कंपनीने कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्याची मागणी

रत्नागिरी : जयगडमधील वायुगळतीनंतर आक्रमक होत पालकांनी आज (१८ डिसेंबर) रस्त्यावर उतरत कंपनीविरोधात रास्ता रोको केला. जयगड पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ यांनी आज संयुक्त बैठक घेतली. या बैठकीनंतर पालकांनी थेट जयगड सागरी पोलीस ठाणे गाठले. तेथे कंपनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली.
गेल्या गुरुवारी जिंदाल कंपनीच्या गॅस प्लांटमधून वायु गळती होऊन त्याचा त्रास शेजारीच असलेल्या जयगड माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना झाला होता. यात ६९ विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले होते. त्यानंतर दोन ते तीन दिवस उपचार घेऊन त्यांना सोडून देण्यात आले होते. मात्र आता आठवडा होत आला तरीही विद्यार्थ्यांसह काही प्रौढ व्यक्तींना या वायू गळतीचा त्रास होत आहे.
आजच्या घडीला २ प्रौढांसह एकूण ३४जण रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल आहेत. याबाबत कंपनीने कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी करत पालक आक्रमक झाले होते. त्यानेत्यांनी रास्ता रोकोही केला. आक्रमक झालेल्या पालकांनी चाल करतर कंपनीचा प्रवेशद्वार बंद करत कंपनीच्या गाड्या देखील रोखल्या असून, या घटनेला कोणतेही हिंसक वळण लागू नये यासाठी जयगड येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.



