मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तशैक्षणिक

लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या सरकारी धोरणांविरोधात रत्नागिरीत भव्य निषेध मोर्चाचे आयोजन

रत्नागिरी: लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या सरकारी धोरणांविरोधात आणि २३ विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला सरकारने ज्या अमानुषपणे चिरडण्याचा प्रयत्न केला, त्याचे तीव्र पडसाद आता रत्नागिरीत उमटणार आहेत. जंतर-मंतर येथील शांततापूर्ण विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलीस बळाचा आणि दडपशाहीचा निषेध करण्यासाठी येत्या गुरुवारी, २३ तारखेला रत्नागिरीत एका भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘शिव-शाहू-फुले- आंबेडकर विचार मंचा’च्या वतीने या मोर्चाची हाक देण्यात आली असून, सरकारच्या या हुकूमशाही आणि संविधानविरोधी कृत्याविरोधात रत्नागिरीतील जनता आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त करणार आहेत.

​दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक नेतृत्वाने विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सलग २२ दिवस शांततेच्या मार्गाने उपोषण केले होते. मात्र, आंदोलकांशी लोकशाही मार्गाने चर्चा करण्याचे सोडून, प्रशासनाने रात्रीच्या अंधारात पोलीस बळाचा वापर करून हे आंदोलन अत्यंत निर्दयीपणे मोडून काढले. एवढेच नव्हे तर, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो तरुणांच्या शांततापूर्ण मोर्चावर लाठीमार करून तो उधळून लावण्यात आला. सरकारच्या या दमनशाहीचा निषेध करण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी रत्नागिरीत हा एल्गार पुकारण्यात आला आहे.

​हा भव्य निषेध मोर्चा गुरुवारी सकाळी ठीक ११.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होईल. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गक्रमण करत तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. संपूर्ण मोर्चामध्ये अत्यंत शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने हा निषेध नोंदवला जाणार आहे.

​विद्यार्थ्यांचे भविष्य आणि देशातील लोकशाही हक्क वाचवण्याची ही लढाई असल्याने रत्नागिरीतील तमाम नागरिकांनी, सर्व विद्यार्थी संघटनांनी, नोकरदार वर्गाने तसेच विविध सामाजिक व राजकीय पक्षांनी आपले पक्षभेद आणि मतभेद बाजूला ठेवून या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे भावुक आवाहन ‘ ‘शिव-शाहू-फुले- आंबेडकर विचार मंच’ आणि स्थानिक नेतृत्वाने केले आहे.

​या महत्त्वपूर्ण आंदोलनाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अभिजीत हेगशेट्ये यांनी मोर्चाची भूमिका मांडली.

या पत्रकार परिषदेला रवींद्र कोकाटे, राजू जाधव, बिपिन आयरे, अशोक भाटकर, राजेंद्र कांबळे आणि बजाज झारी , जुवेदा बुखारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button