मुख्य बातमीसाहित्य-कला

हा तुकारामाचा महाराष्ट्र आहे, अशी ओळख आधुनिक महाराष्ट्रालाही मिळो – ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे

पुणे : न्यू ईरा पब्लिकेशन आणि सरहद पुणेच्या वतीने आयोजित तुकाराम मुंढे यांच्या जीवनावर आधारित ‘तुकाराम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 

ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, महाराष्ट्र पब्लिक स्कूलचे अध्यक्ष अशोक मुंढे, माजी सनदी अधिकारी संग्राम गायकवाड, ‘सरहद’चे संजय नहार, पुस्तकाचे लेखक शफी पठाण आदी या वेळी उपस्थित होते.

स्पर्धेत यश मिळणे, हे मोठी गोष्ट. मात्र, ते तत्त्वाचे अधिष्ठान आयुष्यभर टिकवणे ही सोपी गोष्ट नाही. व्यवस्था भ्रष्ट असावी, असे कोणालाही वाटत नाही. मात्र, नाइलाजाने का होईना, आपण भ्रष्ट होत असतो. आपल्याला भ्रष्ट व्हायची पाळीच येऊ नये, म्हणून आपण तुकाराम मुंढेंना पाठिंबा दिला पाहिजे. असे काम करण्यासाठी नीतिधैर्य लागते. फार निष्कलंक मन असावे लागते ते तुकाराम मुंढे यांच्या ठायी आहे. हा तुकारामाचा महाराष्ट्र आहे, अशी ओळख आधुनिक महाराष्ट्रालाही मिळो. त्यासाठीचे बळ तुकाराम मुंढे यांच्या पाठीमागे उभे करण्याची बुद्धी आणि क्षमता आपल्याला लाभो,’ असे रंगनाथ पठारे यांनी सांगितले.

‘आपल्या वागण्यात, आचरणात नैतिकता नसेल, तर आपण आतून पोकळ असतो. आतून पोकळ होऊ नका. समाजाला पुढे न्यायचे असेल, तर प्रत्येकाने हा पोकळपणा थांबवला पाहिजे. समाजामध्ये जे-जे चांगले घडते, त्यासाठी एकत्र येऊन आपण पुढे जाऊया,’ अशी साद अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी घातली .

‘तुम्ही शिक्षक असो की, शेतकरी, उद्योजक, अभिनेते, राजकारणी कोणत्याही क्षेत्रामध्ये जा आणि बेस्ट पॉसिबल काम करा. नैतिक दृष्टिकोनातून उत्तम काम करा,’ असा सल्लाही तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांना दिला ते म्हणाले,’स्पर्धा-परीक्षेतील यश किंवा अपयश हे अंतिम नसते. बऱ्याचवेळा प्रेरणादायी भाषणे ऐकून स्पर्धा-परीक्षेच्या तयारी सुरूवात केली जाते. स्पर्धा-परिक्षेत यश मिळणे चांगलेच आहे. स्पर्धा-परीक्षा आणि नागरी सेवा हे चांगले माध्यम आहे. मात्र, ते एकमेव, सर्वोत्कृष्ट नाही. स्पर्धा परीक्षा किंवा पद हे फक्त माध्यम आहे. स्पर्धा-परीक्षेची तयारी करणारे कधीच अपयशी होत नाहीत. मात्र, स्पर्धा दुसऱ्याशी करायची नसते. चांगला माणूस बनण्यासाठी स्वतःशी स्पर्धा करायची असते. त्यामुळे या प्रक्रियेतून शिकून एक चांगला माणूस, समाजातील चांगला घटक झाले पाहिजे.

कुटुंबाप्रती-समाजाप्रती असलेली भावना व्यक्त करण्यासाठी आपण उत्तम झालो, तर समाज उच्च पातळीवर जायला जास्त वेळ लागणार नाही. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button