महाराष्ट्र राज्यमुख्य बातमी

मुंबईत ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवण्याची पोलिसांना धमकी; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक सुरक्षा

मुंबई :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लष्कर-ए-जिहादी या दहशतवादी संघटनेकडून मुंबई पोलिसांना भीषण बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी मिळाली आहे, हा संदेश व्हॉटस्अ‍ॅपवर पाठवण्यात आला असून, त्यात 400 किलो आरडीएक्स शहरात आणल्याचा आणि 34 वाहनांत मानवी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर या स्फोटांत एक कोटी लोक ठार होऊ शकतात, असा धक्कादायक उल्लेख संदेशात करण्यात आला आहे.

हा संदेश मिळताच मुंबई पोलिसांनी तत्काळ हाय अलर्ट घोषित केला आहे. शहरात सर्वत्र नाकेबंदी करून संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू झाली आहे. रेल्वेस्थानके, विमानतळ, बाजारपेठा आणि गणेश मंडप परिसरासारख्या गर्दीच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

सायबर तपास सुरु

धमकीचा संदेश मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेला शुक्रवारी मिळाला. यात 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा उल्लेख आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या व्हॉटस्अ‍ॅप क्रमांकावरून हा संदेश पाठवण्यात आला, तो शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सायबर सेल आणि दहशतवादविरोधी पथक तपास करत असून संदेश खरा की खोटा याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक साधनांचा वापर केला जात आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

मुंबई पोलिसांनी नागरिकांना घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. संशयास्पद वस्तू किंवा हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या धमक्या पूर्वी अनेकदा खोट्या ठरल्या असल्या तरी पोलिस कोणताही धोका पत्करणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button