मुख्य बातमीराजकीय

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी ५००० जादा बसेस सोडणार – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक 

मुंबई– अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच कोकणातील चाकरमान्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. आपल्या लाडक्या बाप्पााच्या स्वागतासाठी प्रत्येक चाकरमानी हा कोकणात गावी जात असतो. आता कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ पूर्णपणे सज्ज झाले आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी तब्बल ५००० जादा गाड्या सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २७ ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत असून यासाठी खास २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत एसटी बस उपलब्ध असणार आहेत. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबद्दलची माहिती दिली.

नुकतंच एसटी महामंडळाची एक बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह एसटीचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. या बैठकीत प्रताप सरनाईक यांनी भाष्य केले. गणपती उत्सव हा कोकणच्या चाकरमान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी आणि एसटी यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळ नफा-तोट्याचा विचार न करता धावत असते. यावर्षी सुमारे ५००० जादा बसेस कोकणातील रस्त्यांवर धावणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी या बसेसचे आरक्षण एसटीच्या अधिकृत संकेतस्थळ npublic.msrtcors.com वर उपलब्ध करून देण्यात येत आहे. याशिवाय, बसस्थानकांवरून किंवा MSRTC Bus Reservation ॲपव्दारे देखील आरक्षण करता येईल, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button