मुख्य बातमी

नवनिर्माण कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये उद्यापासून दोन दिवस रंगणार “तंदुरी नाईट्स”

शनिवारी (८ फेब्रुवारी) सायंकाळी ७.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे आयोजित केलेला आणि रत्नागिरीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला “तंदुरी नाईट्स” हा खाद्य महोत्सव उद्यापासून दोन दिवस रंगणार आहे. नवनिर्माण शिक्षण संस्थेतील मोहन खातू क्रीडा संकुल येथे होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन उद्या (८ फेब्रुवारी) सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे. त्यानंतर अनोख्या आणि विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय चवीच्या खाद्य पदार्थांची मेजवानी रत्नागिरीकरांना चाखता येणार आहे.

“तंदुरी नाईट्स”चे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी चिपळूणचे आमदार शेखर निकम, राजापूरचे आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, माजी आमदार सुरेंद्र उर्फ बाळ माने, उद्योजक आनंद देसाई, महेश गुंदेजा, दीपक साळवी, शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अलिमिया पारकर, संस्थेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, राजन शेट्ये, बशीर मुर्तुझा, प्रवीण लाड, संतोष तावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

खाद्य महोत्सवाची दीर्घ परंपरा लाभलेल्या या महोत्सवात एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातून हॉस्पिटॅलिटी स्टडीजचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या आणि सध्या इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया या ठिकाणी तसेच गोवा, मुंबई, अहमदाबाद येथे यशस्वीरीत्या कार्यरत असलेल्या हॉटेल मॅनेजमेंटमधील माजी विद्यार्थ्यांची ही यावेळी विषेश उपस्थिती असणार आहे.

हे या इव्हेंटचे १२ वे वर्ष आहे. नवनिर्माण कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीने दरवर्षी थीम डिनरचे आयोजन केले जाते. यामध्ये आजपर्यंत महाराष्ट्रीयन, गुजराती, राजस्थानी, हैदराबादी आदी वेगवेगळ्या थीमवर डिनर आयोजित केला आहे. या सर्व थीम डिनरना रत्नागिरीकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. दोन दिवस चालणारा हा खाद्य महोत्सव आणखी दोन दिवस सुरू रहावा, अशी विनंती वजा मागणी ही रत्नागिरीकरांकडून वेळोवेळी करण्यात आली आहे.

यंदाही अशाच प्रकारच्या “तंदुरी नाईट्स” या टीम डिनरचे आयोजन केले आहे. यामध्ये रत्नागिरीकरांसाठी द सॅंडविच स्टेशन, मोमो एक्सप्रेस, होम ऑफ बिर्याणी, चिप्स अँड चॅट, कॉम्बो ट्रीट, स्पार्कलिंग स्प्रित्ज स्टेशन, तंदुरी खजाना, चिली ब्लिस अशा अनोख्या आणि विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय खाद्य पदार्थांची रेलचेल या खाद्य महोत्सवात असणार आहे.

हा महोत्सव शनिवार आणि रविवार असा दोन दिवस चालणार असून त्यासाठी मर्यादित जागांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर येते तिकीट खरेदी करून आपली जागा निश्चित करावी आणि चोखंदळ खवय्ये असलेल्या रत्नागिरीकरांनी या खाद्य महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, तसेच हॉटेल मॅनेजमेंट विभाग प्रमुख ताराचंद ढोबाळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button