रत्नागिरी भाजपतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर
सीसीटीव्ही दुरूस्ती व देखभाल करणाऱ्या यंत्रणेवर करवाई व्हावी, युवती अत्याचार प्रकरणातील आरोपींनी त्वरित अटक करून त्यांची नावे जाहीर करण्याची मागणी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सीसीटीव्हींच्या देखभाल व दुरूस्तीकडे लक्ष देण्याबाबत तसेच चंपक मैदान येथे घडलेल्या युवतीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींना त्वरीत अटक करून त्यांची नावे जाहीर करावीत, अशा मागण्यांचे निवेदन रत्नागिरी भाजपच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. अन्यथा भाजपतर्फे वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक ठिकाणी जिल्हा प्रशासनाने सीसीटीव्ही बसविले आहेत, मात्र यातील अनेक सीसीटीव्ही बंद असल्याचे निदर्शनास येत आहेत. यामुळे परिसरात होणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवणे कठीण होणार आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सीसीटीव्हीची होणारी मदत महत्त्वाची असते. गुन्हेगार समजण्यासाठी व शोधण्यासाठी बंद असलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेमुळे अडथळा येत आहे. त्यामुळे संबंधित सीसीटीव्ही दुरूस्ती व देखभाल करणाऱ्या यंत्रणेवर योग्य ती कारवाई करावी, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तसेच दुसऱ्या निवेदनात चंपक मैदानावरील घटना घडून सुमारे ६० तासांचा अवधी उलटला असला तरी नराधम आरोपींसंदर्भात कोणतीही माहिती अजून मिळाली नसल्याचे यात म्हटले आहे. भारतीय जनता पार्टी रत्नागिरी म्हणून आज आम्ही आपणास आरोपींना त्वरीत अटक करून त्यांची नावे जाहीर करावीत अशी विनंती करत असून, याकामी विलंब होत असेल, तर अन्यथा भाजपातर्फे वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असे या निवेदनात नमूद केले आहे. ही दोन्ही निवेदने भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना दिली आहेत.



