मनसे रत्नागिरी शहर अध्यक्षपदी मिलिंद उर्फ बाबय भाटकर यांची नियुक्ती

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रत्नागिरी प्रभारी शहर अध्यक्षपदी मिलिंद उर्फ बाबय भाटकर यांची नियुक्ती करण्यात आली असून, जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी आज (१४ जानेवारी) त्यांना याबाबतचे नियुक्ती पत्र दिले आहे.
शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी कौटुंबिक कारणास्तव या पदावरती कार्यरत राहणे असमर्थ असल्याचे तसेच फक्त महाराष्ट्र सैनिक म्हणून सदैव पक्षासोबत असू, असे जिल्हाध्यक्षांना कळविले होते. म्हणून जिल्हाध्यक्ष श्री. सौंदळकर यांनी आज प्रभारी नियुक्ती केली.
मिलिंद उर्फ बाबय भाटकर हे मनसेच्या स्थापनेपासून कट्टर मनसैनिक म्हणून कार्यरत आहेत. अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच रत्नागिरी शहरातील अनेक समाज कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
या सोबतच शहर सचिव पदी प्रभात सुर्वे, वाहतूक सेना शहर अध्यक्ष पदी गौरव चव्हाण यांची देखील नियुक्ती करण्यात आली. जुन्या कार्यकर्त्यांना कार्यरत करून श्री. सौंदळकर व उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर यांनी मनसे बळकट करून आगामी स्थानिक स्वराज्यसंस्था निवडणुकांमध्ये ताकदीने उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, कामगार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर, माजी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, प्रभात सुर्वे, गौरव चव्हाण, तनिष सुर्वे आदी उपस्थित होते.



